पुणे : माथाडीच्या नावे खंडणी मागणारे अटकेत | पुढारी

पुणे : माथाडीच्या नावे खंडणी मागणारे अटकेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माथाडी संघटनेच्या नावाखाली व्यावसायिकाकडे खंडणी मागणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली. हडपसर आणि येरवडा भागात या घटना घडल्या. विकी नारायण औरंगे (वय 31,रा.गांधीनगर, येरवडा), सागर सुभाष वायकर (वय 36), शिवम मारुती कुंजीर (वय 22, रा. कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी, येरवडा आणि हडपसर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

38 वर्षीय व्यावसायिकाने हडपसर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, व्यावसायिकाचा टेम्पो मांजरी परिसरात एका इमारतीजवळ फर्निचर साहित्य घेऊन आला होता. त्या वेळी वायकर, कुंजीर यांनी टेम्पो अडवला. टेम्पोतील फर्निचर साहित्य आमच्या संघटनेचे कामगार उतरविणार, अशी धमकी वायकर आणि कुंजीर यांनी व्यावसायिकाला दिली. व्यावसायिकाला धमकावून चार हजार 800 रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक दाभाडे तपास करत आहेत. दुसर्‍या एका घटनेत येरवडा भागातील कल्याणीनगर परिसरात टेम्पो अडवून माथाडी संघटनेच्या नावाखाली एक लाख 20 हजार रुपयांची खंडणी मागणार्‍या एकाला अटक करण्यात आली. विकी नारायण औरंगे (वय 31, रा. गांधीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक माल घेऊन कल्याणीनगर भागातील एका कंपनीत आला होता.

त्या वेळी औरंगेने टेम्पो अडवला. त्याने माथाडी संघटनेच्या नावाखाली व्यावसायिकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास माल उतरवू दिला जाणार नाही, अशी धमकी देऊन त्याने तडजोडीत 80 हजार रुपये खंडणीपोटी उकळले. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून औरंगे याला 80 हजार रुपयांची खंडणी घेताना पकडले. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.

हेही वाचा

Pune Crime : शर्टावरील रक्ताच्या डागांमुळे खुनाचा छडा; पाच अल्पवयीन मुले ताब्यात

राजस्थानात पत्नीला निर्वस्त्र करून गावातून धिंड काढली

हवामान : पुन्हा दुष्काळाचे सावट

Back to top button