Pune Crime : शर्टावरील रक्ताच्या डागांमुळे खुनाचा छडा; पाच अल्पवयीन मुले ताब्यात | पुढारी

Pune Crime : शर्टावरील रक्ताच्या डागांमुळे खुनाचा छडा; पाच अल्पवयीन मुले ताब्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वानवडी परिसरातील एका डोंगरावर एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. हा खून पाच अल्पवयीन मुलांनी केला. यातील एका मुलाच्या शर्टावर रक्ताचे डाग असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

महादेव रघुनाथ मोरे (27,रा.काळेपडळ, मूळ अहमदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एका कंपनीत ऑफिस बॉयचे काम करतो. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील दोन मुले मोरे याला ओळखत होते असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी (दि.1) रात्री ही घटना काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव मोरे हा रात्रीच्या वेळी वानवडी परिसरातील एका डोंगरावर दारू पित बसला होता. तेव्हा ही मुले डोंगरावरील मंदिरातून देवदर्शन घेऊन परतत होती. त्यांच्याशी महादेवचा वाद झाला. या वादात मुलांनी त्याला दगड मारले. एक दगड डोक्यावर लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. तो ही माहिती पोलिसांनी देईल या भीतीने मुलांनी आणखी दगडे मारून व मारहाण करत त्याचा खून केला. त्यानंतर ही सर्व मुले पसार झाली होती.

दरम्यान, हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कविराज पाटील हे रात्र कर्तव्यावर असताना, त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका मुलाच्या शर्टावर रक्ताचे डाग असून, तो तुकाईदर्शन येथे घरात आहे. त्यानुसार पाटील यांनी त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मोरे याचा खून केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पाटील त्याला घटनास्थळी घेऊन गेले. तेथे मोरेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. दगडाने डोके ठेचून त्याचा खून करण्यात आला होता. वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार असल्यामुळे त्यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महादेवचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचबरोबर सर्व मुलांना ताब्यात घेण्यात आले. या पाच मुलांपैकी एक मुलगा शाळेत जाणारा असून, इतर मुले मिळेल ती कामे करत असत. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहेत.

हेही वाचा

मराठा समाजाचे आंदोलन : जालन्यात पाच दिवसांत नेमके काय घडले ?

Health insurance : सर्व प्रवर्गांतील दिव्यांगांना आरोग्य विम्याचे कवच; दिव्यांगांना होणार लाभ

आंतरराष्‍ट्रीय : पुतीनशाहीचा बळी?

Back to top button