

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : जेवण बनवण्याच्या कारणावरून एका शेतमजुराने दुसऱ्या शेतमजुराच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील बेडशिंग गावात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुभम लालजी भारतीय (वय ३५, रा. लेडशी, ता. मेजाखास, जि. अलहाबाद, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. तर आरोपी नीरजकुमार लालमणी कुशवाह हादेखील त्याच गावचा रहिवाशी असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बेडशिंग येथे मिलिंद जीवनधर दोशी यांची १२ एकर जमीन आहे. फिर्यादी नीलेश मारुती जांभळकर (वय ३२, रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी ही जमीन वाट्याने करायला घेतलेली आहे. या ठिकाणी शेतीत काम करण्यासाठी किसनकुमार रमेशकुमार कुशवाह, नीरजकुमार लालमनी कुशवाह, मनीष लालमनी कुशवाह आणि शुभम लालजी भारतीय हे उत्तर प्रदेशमधील कामगार या ठिकाणी शेतात मजूर म्हणून काम करत होते.
शुक्रवारी (दि. १) दुपारी जेवण बनवण्यावरून नीरजकुमार कुशवाह आणि शुभम भारतीय यांच्यात वाद झाला होता. तो वाद जांभळकर यांनी मिटवलादेखील होता. त्यानंतर सायंकाळी नेहमीप्रमाणे हे सर्वजण कामावरून घरी आले. गावात सुरू असलेल्या मारुती महादेवाच्या मंदिरातील भंडाऱ्यात त्यांनी जेवणाचा आस्वाददेखील घेतला. मात्र, रात्री उशिरा साडेबारा वाजता घराच्या स्लॅबवर जांभळकर यांना जोरजोराने ओरडल्याचा आवाज आला. जांभळकर यांनी तात्काळ वर जाऊन पाहिले असता नीरजकुमार कुशवाह याच्या हातात कोयता होता. तो नेहमी माझ्याबरोबर भांडण करतो, थांब तुला आता जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून शुभम भारतीय याच्यावर वार केल्याने तो खाली कोसळला. यानंतर जांभळकर यांनी इतर कामगारांच्या मदतीने शुभम याला चारचाकी (एमएच ४२ एएस ५८९४) वाहनातून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इंदापूरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार या घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा :