माध्यमिक शिक्षकांचाही आता निरक्षर सर्वेक्षणावर बहिष्कार | पुढारी

माध्यमिक शिक्षकांचाही आता निरक्षर सर्वेक्षणावर बहिष्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षकांपाठोपाठ आता माध्यमिक शाळांतील शिक्षकांनीही नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार घातला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षण विभागाला निवेदन देऊन माध्यमिक शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याची मागणी केली आहे. माध्यमिक शिक्षकांना यातून न वगळल्यास बहिष्कार घालण्याची भूमिका निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शिक्षकांना निवडणूक आणि जनगणना वगळता अन्य शालाबाह्य कामे देता येत नसल्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे. तसेच अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनाला वेळ मिळत नसल्याने निरक्षर सर्वेक्षणाचे काम शिक्षकांकडून करून घेण्यात येऊ नये, असे निवेदन प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांकडून शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाचे संचालक महेश पालकर यांना देण्यात आले होते. निरक्षरांना साक्षर करणे आवश्यक असल्याने शिक्षकांनी या कामी सहकार्य करण्याचे आवाहन पालकर यांनी परिपत्रकाद्वारे केले. या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव शांताराम पोखरकर यांनी माध्यमिक शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याचे निवेदन दिले.

गेल्या दहा वर्षांत शिक्षक, कर्मचारी भरती न झाल्याने अनेक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक कर्मचार्‍यांची कमतरता आहे. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांकडूनच इतर विषयांचे अध्यापन करून घेतले जात आहे. परिणामी शिक्षकांवर अध्यापनाचा ताण आहे. आता सर्वेक्षणाच्या कामामुळे हा ताण वाढणार आहे. अनेक शिक्षकांना त्यांच्या वयोमानानुसार सर्वेक्षणाचे काम शक्य नाही. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हा मुख्याध्यापक संघटनांनी मुख्याध्यापक महामंडळाकडे सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याची मागणी केली आहे. त्यामुळे माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामामधून न वगळल्यास मुख्याध्यापक महामंडळाचा या सर्वेक्षणावर बहिष्कार असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे ढग

FTIIच्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची नियुक्ती | R Madhavan new FTII President

Rankala Lake : रंकाळ्याचा होणार कायापालट; २० कोटी खर्चाच्या आराखड्‍यातून मिळणार गतवैभव

Back to top button