Rankala Lake : रंकाळ्याचा होणार कायापालट; २० कोटी खर्चाच्या आराखड्‍यातून मिळणार गतवैभव | पुढारी

Rankala Lake : रंकाळ्याचा होणार कायापालट; २० कोटी खर्चाच्या आराखड्‍यातून मिळणार गतवैभव

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव गेल्या काही वर्षांपासून मरणासन्न अवस्थेतून जात आहे; मात्र राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीतून रंकाळ्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. तब्बल 20 कोटींहून जास्त निधीतून रंकाळ्यांचे संवर्धन केले जाणार आहे. तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करण्याबरोबरच सुशोभीकरणामुळे ऐतिहासिक रंकाळ्याला गतवैभव प्राप्त होणार आहे. रंकाळा तलावात विद्युत रोषणाईसह कारंजा, संध्यामठ परिसरात सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे.

मूलभूत सोयी-सुविधाअंतर्गत सुरू असलेल्या कामातून दुचाकी व चारचाकी पार्किंग व्यवस्था करणे, 5 ठिकाणी कमानी व गेटसह गेट वे तयार करणे, विद्युत रोषणाई (स्ट्रीट व फूटलाईट) व सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रंकाळा टॉवर ते तांबट कमानीपर्यंत तलावाच्या भिंतींचे संवर्धन करणे, घाट दुरुस्ती करणे, अपुरा पदपथ पूर्ण करणे, तांबट कमान जतन व संवर्धन, विसर्जन कुंड पूर्ण करणे, लँड स्केपिंग, प्लांटेशन करणे, चार ठिकाणी शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे या कामांचा समावेश आहे. यातील शौचालय बांधण्याचे काम जलसंपदा विभागाच्या परवानगीसाठी आणि गेट वे तयार करण्याचे काम पुरातत्त्व समितीच्या परवान्यासाठी रखडले आहे. पर्यटनमधून मंजूर निधीतून रंकाळा तलावाच्या सभोवतालच्या नादुरुस्त झालेल्या लहान दगडी भिंतींची दुरुस्ती करणे, उतरत्या दगडी भिंतीची दुरुस्ती करणे, रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन करणे, संध्यामठ आणि धुण्याच्या चावी यांचे जतन व संवर्धन करणे या कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासह मिनिचर पार्क व विद्युत रोषणाईच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच कामाला प्रारंभ केला जाणार आहे.

कोल्हापूर हे धार्मिक, पर्यटन, औद्योगिक व क्रीडा क्षेत्रांच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. तसेच शाहूकालीन कोल्हापूरच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर टाकणार्या अनेक हेरिटेज वास्तू दिमाखात उभ्या आहेत. अंबाबाई मंदिर व जोतिबा येथे दर्शनासाठी येणारे भाविक, पर्यटक रंकाळ्याला आवर्जून भेट देतात. रंकाळा तलाव कोल्हापुरातील जनतेचे तसेच पर्यटकांच्या विरंगुळ्याचे व जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. रंकाळा तलाव म्हणजे नैसर्गिक खण असून भुकंपानंतर तेथे झरे पाझरून तलावाची निर्मिती झाली आहे. सातव्या शतकात त्या ठिकाणी समाधी व मंदिरे बांधण्यात आली होती.

1883 सालात रंकाळा बांधण्यात आला. त्यानंतर कालानंतराने चौपाटी, शालिनी पॅलेस, रंकाळा टॉवर, संध्यामठ, नंदी देवालय, धुण्याची चावी अशा ऐतिहासिक व पुरातन वास्तू बांधण्यात आल्या. सद्यस्थितीत रंकाळा तलावाचे नैसर्गिक, पुरातन व ऐतिहासिक सौंदर्य शहरीकरणाच्या गर्दीत झाकोळले आहे. बांधकाम कमकुवत झाले आहे. रंकाळा परिसरात नागरीकांना व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचे संवर्धन व सुशोभिकरण करण्यासाठी विविध विकासकामे करणे आवश्यक आहे.

तातडीने संवर्धनाची गरज

रंकाळा तलावाला आणि तटबंदीला अवकळा आली आहे. जुने घडीव दगड निखळले आहेत. काही प्रमाणात पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे रंकाळ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महापालिकेकडे सुमारे 20 कोटींपेक्षा जास्त निधी पडून आहे. त्यातून लवकरात लवकर रंकाळा संवर्धनासाठी कामे सुरू करणे आवश्यक आहे. संवर्धन आणि सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर रंकाळ्याचे सौंदर्य आणखी खुलणार आहे.

असा आहे रंकाळा…

बांधकाम : 1883 ला
पूर्ण परिसर : 107 हेक्टर
परिमिती : साडेपाच कि. मी.
जलाशय साठा : 44 लाख घनमीटर

Back to top button