Pune News : चाळीस फुटांपेक्षा जास्त उंचीचे मंडप नको! महापालिकेचे गणेश मंडळांना आवाहन | पुढारी

Pune News : चाळीस फुटांपेक्षा जास्त उंचीचे मंडप नको! महापालिकेचे गणेश मंडळांना आवाहन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील गणेशोत्सव मंडळांना गेल्या वर्षी दिलेले उत्सव मंडप, स्वागत कमानी व रनिंग मंडप परवाने या वर्षीही ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मात्र, मंडळांनी 40 फूट उंचीपेक्षा जास्त उंचीचे मंडप उभे करू नयेत, असे आवाहन महापालिकेने शहरातील गणेश मंडळांना केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे यंदाच्या गणेशोत्सवासाठीची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंडळांना न्यायालय, राज्य शासन, पालिका, पोलिस यांचे आदेश पाळणे बंधनकारक राहील.

मंडळांनी प्राधान्याने पर्यावरणपूरक मूर्ती वापराव्यात. उत्सव संपल्यानंतर तीन दिवसांच्या आत स्वखर्चाने सर्व देखावे, मंडप, कमानी, रनिंग मंडप, अन्य काम व साहित्य हटवणे व रस्त्यावर घेतलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रीटने बुजवणे बंधनकारक असेल, असे नियमावलीत नमूद आहे. मंडळांनी परवान्याच्या प्रती मंडपाच्या दर्शनी भागात लावाव्यात. उत्सव मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा अधिक नसावी. 40 फुटांपेक्षा जास्तीचा उत्सव मंडप उभारायचा असल्यास मंडळांनी अधिकृत स्थापत्य अभियंत्यांचे स्टॅबेलिटी सर्टिफिकेट जोडावे. मंडप व स्वागत कमानी उभारताना अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच प्रवासी बसेस इत्यादीसाठी रस्ते मोकळे ठेवावेत. कमानींची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून 18 फुटांपेक्षा अधिक राहील याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार स्वयंसेवक सुरक्षारक्षक नेमावेत, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

गणेशमूर्ती विक्री स्टॉलसाठी मालमत्ता विभागातर्फे शाळांची मैदाने, महापालिकेच्या मोकळ्या जागांच्या ठिकाणी जागा दिली जाणार आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत हंगामी व्यावसायिकांना सोडत पद्धतीने काही अटी, शर्तींवर ठरावीक ठिकाणी गाळे उपलब्ध करून दिले जातील.

नागरिकांना वाहतुकीस अडथळा, ध्वनिप्रदूषण आदींचा सामना करावा लागत असल्यास त्यांनी 1800 103 0222 या टोल फ—ी क्रमांकावर संपर्क साधता येईल. 96899 00002 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर किंवा अतिक्रमण मुख्य कार्यालय 020-25501398 येथेही तक्रार करता येईल.

‘सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बॉक्स कमानी उभारणे टाळावे’

गणेशोत्सवामध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जाहिरातीसाठी बॉक्स कमानी उभारू नयेत, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. नागरिकांच्या आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे आवाहन करण्यात आले असल्याचे अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच प्रमुख रस्त्यांना जाहिराती व मंडप उभारण्यासाठी बॉक्स कमानी उभारल्या जातात. या कमानीच्या आत काही घातक पदार्थ ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच गेल्या काही दिवसांत पुणे शहरात काही दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. त्यांचा शहरात घातपाताचा कट होता. ही स्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सवात सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडळांनी बॉक्स कमानी उभारू नयेत, असे आवाहन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. मंडळांनी बॉक्सऐवजी साध्या कमानी उभारण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा

नाशिक : गगनचुंबी इमारतींवरील बंदी २४ तासांत मागे, आयुक्तांना डावलून घेतला होता निर्णय

पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांना भीषण आग

Rankala Lake : रंकाळ्याचा होणार कायापालट; २० कोटी खर्चाच्या आराखड्‍यातून मिळणार गतवैभव

Back to top button