धक्कादायक ! सासूकडून पैसे उकळण्यासाठी केले स्वतःच्या मुलीचे अपहरण

धक्कादायक ! सासूकडून पैसे उकळण्यासाठी केले स्वतःच्या मुलीचे अपहरण
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  सासूकडून दहा लाख रुपये उकळण्यासाठी एकाने स्वतःच्या आणि मेहुणीच्या मुलीच्या अपहरणाचा बनाव रचला. त्यानंतर खंडणीसाठी फोन करून दबाव आणला. मात्र, वाकड पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणून मुलीची सुटका करीत नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना बुधवारी (दि. 30) दुपारी रहाटणी येथे घडली. सचिन मोहिते, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सारिका कैलास ढसाळ (38, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी मध्यरात्री उपनिरीक्षक रोहित दिवटे आणि त्यांचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी कोकणे चौकात पोलिसांनी काहीजण घाईगडबडीत जात असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. त्या वेळी सारिका ढसाळ यांनी सांगितले की, त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि त्यांची बहीण शीतल सचिन मोहिते (रा. वाघोली) यांची 15 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे.

पोलिस पथक केले तयार
वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पथके तयार करून मुलींचा शोध सुरू केला. त्या वेळी आरोपी सचिन मोहितेदेखील पोलिस ठाण्यात हजर होता. आपल्याला याबाबत काहीच माहिती नसून मी आत्ताच वाघोली येथून आलो असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. बोलण्यात विसंगती आढळल्याने सचिन याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. दरम्यान, तुमच्या मुली सुखरूप पाहिजे असतील तर पोलिसांना काही न सांगता दहा लाख रुपये द्या; नाहीतर तुमच्या मुलीचे बरेवाईट करेन अशी धमकी अपहरणकर्त्याने फोनवर दिल्याचे सचिन याने कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सचिन मोहिते याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी सचिनकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. सासू पुष्पा अल्हाट यांना भीती दाखवून त्यांच्या बँकेत असणार्‍या पैशातील दहा लाख रुपये मिळवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव केल्याची कबुली त्याने दिली.

यांनी केली कामगिरी
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, रोहित दिवटे, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, वंदू गिरे, संदीप गवारी, स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अतिश जाधव, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, भास्कर भारती, अजय फल्ले, रमेश खेडकर, कौंतेय खराडे, सागर पंडीत यांनी ही कामगिरी केली.

अशी केली मुलींची सुटका
आरोपीने दोन्ही मुलींना वाघोली येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले असून, त्या सकाळी दहा वाजता वाघोली येथून निघून मनपा पुणे येथे येणार आहे, असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी मनपा पुणे येथे तीन पथके पाठवली. मात्र, मुली वेळेत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढू लागली. पोलिसांनी वेळ न दवडता सचिनला घेऊन त्याने मुलींना ठेवलेले ठिकाण गाठले. मात्र, तेथेदेखील मुली सापडल्या नाहीत. त्यानंतर पोलिसांनी पीएमपीएल प्रशासनाशी समन्वय साधत वाघोली ते पुणे मनपा दरम्यानच्या बसचालक व वाहकांना संपर्क केला. त्यांना फोटो पाठवून माहिती घेतली. त्यावरून दुपारी दीडच्या सुमारास मुलींना बसमधून सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news