पिंपरी : मोशीला 15 एकर जागेत साकारणार अत्याधुनिक रुग्णालय.. | पुढारी

पिंपरी : मोशीला 15 एकर जागेत साकारणार अत्याधुनिक रुग्णालय..

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मोशी येथे 15 एकर जागेत महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक वैद्यकीय सुविधायुक्त आठ मजली रुग्णालय साकारणार आहे. कामाचे आदेश दिल्यानंतर पुढील तीन वर्षांत या रुग्णालयाचे काम पूर्ण होईल. रुग्णालयासाठी 340 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रुग्णालयामुळे मोशी आणि परिसरातील रुग्णांची सोय होणार आहे. महापालिकेच्या वतीने सध्या शहरामध्ये 8 रुग्णालये कार्यरत आहेत. त्यामध्ये महापालिकेचे पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्था हे रुग्णालय सर्वाधिक मोठे आहे.

त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने नव्याने काही रुग्णालये सुरू करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन आकुर्डी रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, अजमेरा कॉलनी येथील नेत्र रुग्णालय आदींचा समावेश आहे. त्याशिवाय, चिंचवड येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, सांगवी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय आदी रुग्णालये सध्या कार्यरत आहेत.

ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर इमारत
ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर आधारित ही इमारत असणार आहे. त्या दृष्टीने इमारत उभारताना आवश्यक नियोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती स्थापत्य विभागाचे सह-शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.

मोशी येथील रुग्णांची होणार सोय
मोशी येथील रुग्णांना उपचार घ्यायचे असल्यास एक तर नवीन भोसरी रुग्णालयात यावे लागते किंवा थेट वायसीएम रुग्णालय गाठावे लागते. मोशीत साकारणार्‍या नवीन रुग्णालयामुळे येथील नागरिकांची चांगली सोय होऊ शकणार आहे. मोशी, चिखली तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना घराजवळ महापालिका रुग्णालयाची सोय मिळू शकेल. पर्यायाने, वैद्यकीय उपचारासाठी त्यांची धावाधाव होणार नाही.

रुग्णालयात मिळतील या वैद्यकीय सुविधा
मोशीतील रुग्णालयात 750 खाटांची सोय असणार आहे. त्याचप्रमाणे, बाह्यरुग्ण विभाग, तातडीक सेवा, कान-नाक-घसा तसेच, नेत्र विभाग असेल. सीटी स्कॅन आणि एमआरआयची सुविधा मिळणार आहे. त्याचप्रमाणे, रेडिओलॉजी, डे-केअर, मानसोपचार विभाग, रक्तपेढी, सोनोग्राफी, त्वचारोग, स्त्रीरोग, श्वसन नलिकेच्या आजारासंबंधित ओपीडी, 10 शस्त्रक्रिया कक्ष, 40 खाटांचे 4 आयसीयू, 10 खाटांचे एनआयसीयू, बालरोग, अस्थिरोग आदी वॉर्ड असतील.

हेही वाचा :

Grand Alliance meeting: मुंबईत महायुतीची बैठक सुरू; मुख्यमंत्र्यांसह २ उपमुख्यमंत्री देखील उपस्थित

सोलापूर : जिल्ह्यातील ४० मंडळात प्रमाणापेक्षा कमी पाऊस

Back to top button