जगातील सर्वात मोठा दरोडा! | पुढारी

जगातील सर्वात मोठा दरोडा!

बगदाद : जुन्या जमान्यात अनेक गावांमध्ये दरोडेखोरांची दहशत असायची. कथा-कादंबर्‍या तसेच चित्रपटांमध्येही दरोडेखोर दिसत असत. चंबळच्या खोर्‍यातील दरोडेखोरांची दहशत लोक विसरलेले नाहीत. ‘शोले’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही दरोडेखोरांच्या अशा दहशतीचे प्रतिबिंब पाहायला मिळते. जगात अनेक ठिकाणी बँकांसारख्या ठिकाणी दरोडे घालणार्‍या टोळ्या होत्या. काही दरोडे तर राजरोस, दिवसाढवळ्याही घातले जातात. त्यापैकी सर्वात मोठा दरोडा इराकमध्ये एका बँकेवर पडला होता. विशेष म्हणजे या दरोड्यात खुद्द राष्ट्राध्यक्षांच्या मुलाचाही समावेश होता!

ही घटना मार्च 2003 मधील आहे. त्यावेळी इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी सद्दाम हुसेन होते. त्यांचे अमेरिकेशी किती मोठे शत्रुत्व होते हे जगजाहीर आहे. असे म्हणतात की इराकने अमेरिकेवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती. त्या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय बगदाद येथील इराकी सेंट्रल बँकेत पोहोचला आणि त्याने बँकेच्या प्रमुखाच्या हातात एक कागद दिला. या कागदावर लिहिले होते की सुरक्षा कारणांमुळे बँकेतील सर्वच रक्कम राष्ट्राध्यक्षांनी दुसर्‍या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आदेश दिला आहे. त्या काळी इराकमध्ये सद्दाम यांचा मोठाच दरारा होता. त्यांचा आदेश धुडकावण्याची बिशाद कुणामध्येही नव्हती.

त्यामुळे बँकेच्या प्रमुखाने पैसे घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यांच्यापुढे दुसरा पर्यायही नव्हता! असे सांगितले जाते की सद्दाम हुसेनच्या मुलाने या इराकी बँकेतून इतके पैसे लुटले होते की त्याला ते घेऊन जाण्यासाठी तीन मोठे ट्रक लागले होते. लुटलेली रक्कम ट्रकांमध्ये भरण्यासाठी पाच तास लागले होते. त्यानंतर खरोखरच अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि सेंट्रल बँकेवरही ताबा मिळवला. मात्र, बँकेतील रक्कम आधीच नेण्यात आली होती व ती अमेरिकेच्या हाती लागली नाही! बँकेतून लुटलेली रक्कम सुमारे 1 अब्ज डॉलर्सची होती असे म्हटले जाते. कुणी म्हणते ही रक्कम 2.5 अब्ज डॉलर्सची होती. आजही या रकमेचा ठावठिकाणा सापडलेला नाही.

Back to top button