अ‍ॅझटेक संस्कृतीमधील दगडी मूर्तींचा शोध | पुढारी

अ‍ॅझटेक संस्कृतीमधील दगडी मूर्तींचा शोध

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये इ.स. 1300 ते 1521 या काळात अ‍ॅझटेक संस्कृती नांदत होती. आता मेक्सिको सिटीमधील पुरातत्त्व संशोधकांनी अ‍ॅझटेक संस्कृतीच्या काळातील अनेक छोट्या दगडी मूर्ती उत्खननात शोधून काढल्या आहेत. एका दगडी पेटीत या मूर्ती ठेवलेल्या आढळल्या. या पंधरा मूर्तींपैकी चौदा पुरुषांच्या असून एक स्त्रीची आहे. ही स्त्री मूर्ती पंधरा मूर्तींपैकी सर्वात लहान आकाराची आहे. पूजाविधीसाठी या मूर्तींचा वापर केला जात असावा असे संशोधकांना वाटते.

अ‍ॅझटेक संस्कृतीमधील सध्या ‘टेम्प्लो मेयोर’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या मंदिराच्या जागी या मूर्ती आढळल्या. ही जागा एकेकाळी टेनोचटिटलान या अ‍ॅझटेक साम्राज्याच्या राजधानीतील मंदिरांचा परिसर होता. सन 1521 मध्ये स्पॅनिश आक्रमकांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले. सध्या तिथे मेक्सिको सिटी मेट्रोपोलिटन कॅथेड्रल आहे.

सुरुवातीच्या काळातील मेसोअमेरिकन संस्कृतीमधील मेझकाला शैलीनुसार घडवलेल्या पंधरा मूर्ती आता इथे सापडल्या आहेत. दक्षिण मेक्सिकोतील ग्युरेरो येथे एकेकाळी ही संस्कृती नांदत होती. तिथे मानवी आकाराच्या अनेक मूर्ती घडवल्या जात असत. या मूर्ती अ‍ॅझटेक लोकांनी लढाईवेळी लुटून घेतल्या असाव्यात असे संशोधकांना वाटते. त्यांना या मूर्तींचे महत्त्व माहिती होते. यापैकी काही मूर्ती एक हजारपेक्षाही अधिक वर्षांपूर्वीच्या आहेत.

Back to top button