पुण्यातील मेट्रोचा विस्तार वाढणार : मेट्रो धावणार थेट लोणी काळभोरपर्यंत ! ‘या’ दोन मार्गांचा आराखडा तयार | पुढारी

पुण्यातील मेट्रोचा विस्तार वाढणार : मेट्रो धावणार थेट लोणी काळभोरपर्यंत ! 'या' दोन मार्गांचा आराखडा तयार

पांडुरंग सांडभोर

पुणे : पुण्यातील मेट्रोचा विस्तार भविष्यात आणखी वाढणार आहे. शहरात दुसर्‍या टप्प्यात हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड या दोन 17 कि. मी. मार्गांवर मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोने पुणे महापालिकेला सादर केला आहे. या मार्गांसाठी 4 हजार 757 कोटींचा खर्च येणार आहे. पालिका प्रशासनाकडून या आराखड्यावर मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या टप्प्यातील 32 कि.मी. मार्गावरील मेट्रो प्रत्यक्षात साकारत आहे. तर हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 कि.मी. मेट्रो मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यातच आता दुसर्‍या टप्प्यातील 44.7 कि.मी. मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्य सभेच्या मंजुरीने नुकताच आता राज्य शासनाकडे मंजुरीसाठी गेला आहे.

त्यात नव्याने पूर्व भागात आणखी 17 कि. मी.चा मेट्रो प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. यामध्ये हडपसर ते लोणी काळभोर (11.35 कि. मी.) आणि हडपसर ते सासवड रोड (5.57 कि.मी.) अशा एकूण 16.92 कि.मी. मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर महामेट्रोने महापालिकेने सादर केला आहे.

राज्य शासनाकडे मंजुरीसाठी गेलेल्या मार्गांमध्ये स्वारगेट- हडपसर- खराडी मार्गाचा समावेश आहे. तसेच पीएमआरडीच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हडपसर या मेट्रो मार्गाचे नियोजन सुरू आहे, त्यामुळे हडपसरपर्यंत होणारी मेट्रो लक्षात घेऊन हडपसरपासून पुढे लोणी काळभोर आणि सासवड रोड या दोन मार्गांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे, त्यामुळे भविष्यात स्वारगेट अथवा शिवाजीनगर वरून थेट लोणी काळभोर आणि सासवड रोडपर्यंत मेट्रोच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. या नवीन मार्गांचा प्रस्ताव आता प्रशासनाकडून स्थायी समितीमार्फत मुख्यसभेच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेवर आर्थिक बोजा नाही

या दोन्ही मार्गांसाठी पुढील पाच वर्षांचे दर लक्षात घेऊन 4 हजार 757 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. स्वतंत्र कंपनीच्या माध्यमातून (एसपीव्ही) हा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून, त्यात महापालिकेचा हिस्सा हा केवळ जागेच्या स्वरूपातील मोबदल्यात असणार आहे, त्यामुळे पालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही.

…असा असेल हडपसर ते लोणी काळभोर मार्ग

हडपसर ते लोणी काळभोर हा एकूण 11.35 कि.मी.चा पूर्ण एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. या मार्गावर एकूण 11 मेट्रो स्टेशन असणार आहेत. त्यामध्ये हडपसर, हडपसर फाटा, हडपसर बस डेपो, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, स्टड फार्म, मांजरी फाटा, द्राक्ष बाग, टोलनाका, वाकवस्ती, लोणी काळभोर अशी स्टेशन असणार आहेत. हा मार्ग अस्तित्वातील सोलापूर रस्त्यावरून आखण्यात आला आहे.

हडपसर ते सासवड रोड…

हडपसर ते सासवड रोड हा जवळपास साडेपाच कि.मी. लांबीचा मार्ग आहे. त्यावर सिव्हिल एव्हिएशन ग्राऊंड, फुरसुंगी आयटी पार्क, सुलभ गार्डन आणि सासवड रेल्वे स्टेशन ही चार स्टेशन असणार आहेत.

हेही वाचा

जगातील सर्वात मोठा दरोडा!

नाशिकमध्ये गगनचुंबी इमारतींना बंदी, ९० मीटर उंच अग्निशमन शिडी खरेदीचा प्रस्ताव रखडल्याने नामुष्की

‘अशांत’ देशातील पहिली रणरागिणी

Back to top button