‘अशांत’ देशातील पहिली रणरागिणी | पुढारी

‘अशांत’ देशातील पहिली रणरागिणी

अपर्णा देवकर, राजकीय अभ्यासक

स्वातंत्र्यपूर्व काळ असो किंवा स्वातंत्र्यानंतरची साडेसात दशके असोत, समकालीन परिस्थितीमध्ये अनेक आव्हानांचा सामना करत भारतीय महिलांनी कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. शिक्षण, क्रीडा, विज्ञान, अर्थकारण, कॉर्पोरेट विश्व, समाजकारण, संरक्षण अशा कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे, तर कांकणभर चढ ठरणारी कामगिरी केल्याचे अनेक दाखले इतिहासाच्या पानांवर आढळतात. आजही ही परंपरा सुरू असून गीतिका श्रीवास्तव यांच्या रूपाने त्यामध्ये एक नवे पान जोडले गेले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत असलेल्या गीतिका श्रीवास्तव यांची पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयात भारताच्या नवीन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातील भारतीय मिशनच्या प्रमुख म्हणून विराजमान होणार्‍या त्या पहिल्या महिला असतील. स्वातंत्र्यानंतर भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून उदयास आला आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रतिभा दाखवून सन्मान मिळवला. दर्जेदार शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून महिलांनी केवळ आर्थिकद़ृष्ट्या स्वत:ला बळकट केले नाही, तर काही विशिष्ट पदांवर राहून कौशल्य सिद्ध केले.

उद्योग, व्यवसाय, बँकिंग सेवा आणि डिजिटलायझेशनच्या युगात महिलांनी स्वत:ला सामाजिक आणि आर्थिकद़ृष्ट्या सक्षम केले. भारतात महिलांनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान, राष्ट्रपती अशी महत्त्वाची आणि सन्मानाची पदे भूषवली आहेत.

इतिहासात डोकावल्यास, झाशीची राणी लक्ष्मीबाई ते भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत महिलांनी समाजात परिवर्तनाची उदाहरणे घालून दिली. भारतीय मुलींनी क्रीडा क्षेत्रातही जगाला चकित केले आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दात सांगायचे, तर भारतीय महिला ऊर्जा, दूरद़ृष्टी, चैतन्यशील उत्साह आणि वचनबद्धतेने सर्व आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहेत. महिला या केवळ घराचा प्रकाशच नाहीत, तर या प्रकाशाची ज्योतही आहेत. भारतीय महिलांनी सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अलीकडेच आता परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत असलेल्या गीतिका श्रीवास्तव यांची पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयात भारताच्या नवीन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रभारी सुरेश कुमार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या या पदाचा कार्यभार स्वीकारतील. गीतिका या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातील भारतीय मिशनच्या प्रमुख म्हणून विराजमान होणार्‍या पहिल्या महिला असतील.

1947 मध्ये श्री प्रकाश यांना तत्कालीन पाकिस्तानात भारतीय उच्चायुक्त म्हणून पाठवण्यात आले. तेव्हापासून नवी दिल्लीचे प्रतिनिधित्व नेहमीच पुरुष उमेदवारांनीच केले आहे. इस्लामाबादमधील शेवटचे भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया होते. 2019 मध्ये काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांचा दर्जा कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिसारिया यांना माघारी बोलावण्यात आले. पाकिस्तानमध्ये याआधीही महिला अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र त्यांना कधीही कोणताही प्रभार देण्यात आलेला नाही. सर्वोच्च स्तरावर महिलेची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गीतिका यांना विदेश सेवेचा मोठा अनुभव आहे. गीतिका श्रीवास्तव 2005 मधील बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. मूळच्या उत्तर प्रदेशच्या असणार्‍या गीतिका सध्या परराष्ट्र मंत्रालयाच्या इंडो-पॅसिफिक विभागात सहसचिव म्हणून काम पाहत आहेत. त्या अस्खलित चिनी (मँडरीन भाषा) बोलतात. 2007 ते 2009 दरम्यान गीतिका यांनी चीनमध्ये असणार्‍या भारतीय दूतावासातही काम पाहिले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आजही तणावग्रस्त असताना त्यांची नियुक्ती झाली आहे. गीतिका उभय देशांमधील गुंतागुंतीचे संबंध सोडवण्यामध्ये अधिक प्रभावी ठरतील, अशी अपेक्षा आहे.

Back to top button