पुणे : वाहनतळांसाठी मेट्रोनेच जागा शोधाव्यात ; महापालिका आयुक्तांच्या सूचना | पुढारी

पुणे : वाहनतळांसाठी मेट्रोनेच जागा शोधाव्यात ; महापालिका आयुक्तांच्या सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मेट्रो स्टेशनच्या परिसरात मेट्रो प्रवाशांना वाहन पार्कगिंची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळे महामेट्रोने अशा जागा शोधाव्यात आणि आम्हाला यादी द्यावी, आम्ही त्यावर आरक्षण टाकून त्या मेट्रोला देऊ, अशी सूचना महामेट्रोला केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. पुणे आणि पीएमआरडीए मेट्रो आणि एचसीएमटीआर या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री वॉर रूममध्ये बैठक झाली. या बैठकीविषयी माहिती देताना विक्रम कुमार म्हणाले, की मेट्रोला महापालिकेच्या हिश्यापोटी 40 कोटी देण्यात आले आहेत.

उर्वरित 150 कोटी डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत. सध्या शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय याठिकाणी प्रवाशांना वाहनतळाची व्यवस्था आहे. मात्र, अन्य मेट्रो स्टेशनला वाहनतळाची व्यवस्था करण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यानुसार 100 ते 150 मीटर परिसरातील महापालिकेच्या जागा मेट्रोला वाहनतळांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वाहनतळासाठी जागा महामेट्रोने शोधाव्यात आणि आम्हाला यादी द्यावी, आम्ही त्यावर आरक्षण टाकून त्या मेट्रोला देऊ, अशी सूचना महामेट्रोला केल्याचे विक्रम कुमार यांनी दिली.

गणेशखिंड रस्त्याचे भूसंपादन लवकरच
पीएमआरडी मेट्रोसाठी गणेशखिंड रस्त्याचे तातडीने भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रक्रिया राबवणार आहे. रॅम्प उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साडेचार मीटर भूसंपादन करण्यात येणार आहे. जागा मालकांची संमती मिळाल्यानंतर याठिकाणी ज्यांच्या सीमाभिंत काढण्यात येत आहे. जागा मालकांना महापालिका सीमाभिंत बांधून देणार असून, यासाठी येणारा खर्च महापालिका आणि पीएमआरडीकडून करण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर मेट्रोचा वापर करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसाला 4 हजार होती. मात्र, दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर प्रवाशांची संख्या दररोज 40 हजारांवर पोहचली आहे. असे असले तरी मेट्रोच्या मार्गावरील पीएमपीएमएलच्या बस प्रवाशांची संख्या कोठेही कमी झालेली नाही. त्यामुळे मेट्रो प्रवाशांची वाढलेली संख्या ही चारचाकी व दुचाकी वापरणार्‍यांची असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
                                                      विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका 

हेही वाचा :

Asia Cup 2023 : पाकिस्तानशी क्रीडासंबंध धोरण की राजकारण?

चकचकीत रस्ता खोदणं बरं नव्हं ! पुणे पालिकेचा कारभार

Back to top button