चकचकीत रस्ता खोदणं बरं नव्हं ! पुणे पालिकेचा कारभार | पुढारी

चकचकीत रस्ता खोदणं बरं नव्हं ! पुणे पालिकेचा कारभार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा कारभार ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय…..’ असा सुरू असून, पथ विभागाने पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेला हांडेवाडी येथील चकचकीत रस्ता पाणीपुरवठा विभागाने पुन्हा खोदला आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे.  शहरातील गेल्या दोन-अडीच वर्षांत समान पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन व विविध सेवा वाहिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. खोदकामानंतर रस्ते व्यवस्थित  दुरुस्त  न केल्याने अनेक ठिकाणी शहरात रस्ते खचलेले आहेत.
रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पथ विभागाने रस्ते दुरुस्तीचे कामकाज युद्धपातळीवर हाती घेतले होते. पथ विभागाने 300 कोटी रुपये खर्च करून शहरातील सर्व रस्ते चकाचक करण्याचे नियोजन केले आहे.  यासाठी सहा पॅकेजमध्ये निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पॅकेज नंबर एक, दोन, तीन याच्या निविदा मंजूर करून प्रत्यक्ष कामाचे आदेश देण्यात आले; तर पॅकेज क्रमांक चार आणि पाच हे वादात सापडल्याने ते रद्द करून त्यांची निविदा पुन्हा एकदा मागविलेली होती. त्यानंतर या निविदेला मंजुरी देण्यात आली.
पॅकेज चारमध्ये पहिल्या टप्प्यात 9 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यानंतर हांडेवाडी रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याचे काम अवघ्या 15 दिवसांपूर्वी झाले होते. महात्मा फुले चौकापुढील इंडियन ऑयल पेट्रोल पंपासमोरील रस्ता समान पाणीपुरवठा योजनेसाठी कोणतीही पूर्व परवानगी न घेता खोदण्यात आला. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी विविध विभागामध्ये समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
रस्ता केल्यानंतर तो समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी पंधरा दिवसांतच खोदण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. कोणतेही काम केव्हा केले जाणार आहे, याचे नियोजन आधीच केले जाते. असे असताना रस्ता करताना संबंधित अधिकार्‍यांनी पथ विभागाला सांगणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता काम झाल्यावर रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यास नोटीस बजावण्यात येणार आहे. 
                                                                       – विकास ढाकणे, अतिरिक्त  आयुक्त, महापालिका. 
हेही वाचा :

Back to top button