

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांना दोनदा पंतप्रधान होण्याची संधी होती, ती त्यांनी घालवली. ते अत्यंत हुशार असल्याने जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करू शकले असते. आता शरद पवारांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी निवृत्त झाले पाहिजे, असे मत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख सायरस पूनावाला यांनी व्यक्त केले. सायरस एस. पूनावाला यांनी पुण्यात मिस वर्ल्ड आणि मिस इंडिया यांची भेट घेतली आणि त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर कोरेगाव पार्क येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांच्याबाबत विचारणा झाली असता, त्यांनी शरद पवारांनी निवृत्त व्हावे, असा सल्ला दिला. अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होताना आता साहेबांनी निवृत्त व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी, असे भाष्य केले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात शाब्दिक चकमकही झाली. अशा परिस्थितीत शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मित्र असणार्या सायरस पूनावाला यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचा पुनरुच्चार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :