Narali Purnima 2023 : नंदिवली कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा पारंपरिक मिरवणुकीतून साजरी | पुढारी

Narali Purnima 2023 : नंदिवली कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा पारंपरिक मिरवणुकीतून साजरी

सापाड; योगेश गोडे : कल्याण पूर्व नंदिवली कोळीवाडा गावात नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावच्या तलावावर कोळी बांधवांनी पारंपारिक पेहराव परिधान करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. वाजत गाजत मानाचा सोन्याचा नारळ आपल्या मायबाप असलेल्या दर्यासागराला अर्पण करत भरघोस म्हावरं जाळ्यात गावण्याची विनंती यावेळी मच्छिमार रामदास ढोणे यांनी समाज बांधवांच्या वतीने केली.

नंदिवली कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेनिमित्ताने पारंपारिक वेशभूषा धारण करून समाज बांधवांकडून कोळी नृत्ये सादर करण्यात आली. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ समुद्रात विधिवत सोडण्याची प्रथा आहे. या प्रथेप्रमाणे दर्याराजाला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीसाठी निघतात. नांदीवली कोळीवाडा परिसरात नारळी पौर्णिमेची धूम कोळी नृत्याच्या आविष्कारातून दिसून आली. लुगडे-रुमाल, अंगावर दागिने हा परंपरागत पेहराव परिधान करून नाचत, गात दर्या राजाला सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी नंदिवली कोळीवाडा गजबजलेले होता. ही कोळी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी नंदिवली गावातील तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात नारळी पौर्णिमा मिरवणूकीत सहभागी होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत होते.

होडीवर सोनेरूपी नारळाची प्रतिकृती

आज 21 व्या शतकात ही आपली संस्कृती, रीती-रिवाज टिकवून ठेवण्यासाठी नांदीवली कोळीवाडा दर्या राजाला सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी सज्ज झाला होता. आपल्या अनोख्या परंपरेचे दर्शन व्हावे यासाठी होडीवर सोनेरूपी नारळाची प्रतिकृती ठेवून होडीला सजविण्यात आले होते. पुरुषांनी कमरेला बांधलेला रुमाल, डोक्यावर टोपी, हातात फलती तर महिलांनी नऊवारी लुगडे नेसून अंगावर सोन्याचे दागिने असा पेहराव करीत नाचत, गात मिरवणुकीत सहभागी होऊन गावाच्या तलावाकडे निघाले होते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळीवाड्यातून निघणारी मिरवणूक, मानाचे नारळ अर्पण करण्यासाठी उत्साहाने निघालेले कोळीबांधव, नारळी पौर्णिमेच्या गाण्यांची असणारी धूम ही गाणी आणि वाद्यांबरोबरच लहान मुलांसह महिला पुरुषवर्गालाही ठेका धरायला लावणारी असते. यावेळी पारंपरिक वेषभूषेबरोबरच कोळी बांधवांचा पेहराव, डोक्यावर लाल टोपी आणि रुमाल, सदरा तसेच महिलांचा पारंपरिक पेहराव, दागिन्यांनी मढलेल्या स्त्रिया, अंबाडा, त्यावर फुलांच्या वेण्या आणि त्यांनीही गाण्यांवर धरलेला ठेका हा कोळीगीतांचा ताज लेऊन कोळीवाडा दुमदुमून टाकणारा ठरतो. गावच्या तलावावर हा सण साजरा केला जात असतांना नोकरी-व्यवसायाद्वारे मच्छीमार बांधवांनीही आपल्या परंपरागत वेषात मिरवणुका काढून जवळच्या नदीत सोनेरूपी नारळ अर्पण करून समुद्रात मासेमारीला गेलेल्या आमच्या मच्छीमार बांधवांचे रक्षण कर, त्यांच्या बोटीला भरपूर सोनेरूपी मासळी मिळू दे! अशी प्रार्थना केली जाते.

शासनाने 1 जून ते 31 जुलै असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केल्याने अनेक वर्षांपासून नारळी पौर्णिमेला सागराची पूजा करून नंतरच समुद्रात आपल्या बोटी पाठविण्याच्या प्रथेला छेद देण्याचा प्रयत्न शासना कडून करण्यात आल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी आहे. दिवसेंदिवस मत्स्यसंपदेत घट होत असताना मत्स्यवाढीसाठी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत नारळी पौर्णिमेपर्यंत वाढ करावी. अशी कित्येक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करण्याची सुबुद्धी शासनाला व्हावी असे कोळी समाजाचे मच्छिमार रामदास ढोणे यांनी सांगितले.

Back to top button