

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरुद्ध काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी उभारलेली 'इंडिया' आघाडी म्हणजे 'बारुद नसलेला बॉम्ब' असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Chandrasekhar Bawankule)
बुधवारी ते माध्यमांशी संवाद साधत होते. इंडिया आघाडीचे घटक पक्ष मुंबईत बैठकीसाठी एकत्र आले आहेत. मात्र, ही त्यांची नौटंकी असून ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि निघून जातील. त्यांच्या बैठकीत कोणतेही तथ्य नाही. त्यांच्या आघाडीत कुणीही कुणासोबत नाही. आघाडीतील १०-१२ पक्ष असे आहेत की, त्यांचे कुठेही मंत्री देखील नाहीत. पंतप्रधान मोदीच्या विरोधात महाराष्ट्रात काही करता येईल का? असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपचा ४५ हून अधिक लोकसभा मतदारसंघात विजय होईल. (Chandrasekhar Bawankule)
प्रकाश आंबेडकर यांना विरोधकांच्या आघाडीत बोलविले नसल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना बोलाविण्याचा निर्णय त्यांचा असला तरी त्यांची भूमिका कधीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पटली नाही. काँग्रेस नेहमीच डॉ. आंबेडकरांविरुद्धच राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसनेच केला होता, तेव्हा आणि आजही त्यांची भूमिका कायम आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात जो कुणी त्यांच्या संकल्पाला साथ देण्यासाठी येईल, त्यांचे एनडीएमध्ये स्वागत केले जाईल.
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत जे आश्वासन काँग्रेसने जनतेला दिले आहे. ते कधीही पूर्ण करू शकणार नाहीत, एकप्रकारे त्यांनी कर्नाटकच्या जनतेला फसविले आहे. १० वर्षांचे बजेट जरी ५ वर्षांत खर्च केले तरी देखील ती आश्वासने पूर्ण होणार नाहीत, असा दावा बावनकुळे यांनी केला.
हेही वाचा