तब्बल 30 हजार झेंडे पडून !! | पुढारी

तब्बल 30 हजार झेंडे पडून !!

मिलिंद कांबळे

पिंपरी : मेरी मिट्टी, मेरा देश (मिट्टी को नमन, वीरों को नमन) या मोहिमेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तब्बल 50 हजार कापडी (सिल्क) राष्ट्रध्वज 24 रुपये दराने थेट पद्धतीने खरेदी केले. त्यासाठी तब्बल 12 लाख रुपये खर्च केला. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या म्हणजे 15 ऑगस्टपूर्वी एक ते दोन दिवसआधी उपलब्ध झालेले परंतु, जनजागृती न झाल्याने तब्बल 30 हजार झेंडे पडून आहेत. महापालिका प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

मेरी मिट्टी, मेरा देश या मोहिमेत भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस घरावर कापडी झेंडे लावण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी शहरवासीयांना केले होते. ऐनवेळेला या मोहिमेसाठी झेंड्यांची मागणी मध्यवर्ती भांडार विभागाकडे करण्यात आली. कमी कालावधी राहिल्याने भांडार विभागाने गेल्या वर्षी खरेदी केलेल्या ठेकेदारांकडून झेंडे थेट पद्धतीने खरेदी केले. एकूण 50 हजार झेंडे 24 रुपये दराने खरेदी करण्यात आले.

मात्र, सर्व 8 क्षेत्रीय कार्यालय झेंडे विक्री केंद्र सुरू केल्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही. त्या उपक्रमाची महापालिका प्रशासन, क्षेत्रीय कार्यालय तसेच, जनसंपर्क विभागाने जनजागृती मोहीम राबविलीच नसल्याने नागरिकांना त्याबाबत समजले नाही. झेंडे स्वातंत्र्य दिनाच्या एक ते दोन दिवसआधी सर्व क्षेत्रीय कार्यालयांपर्यंत पोहोचले. आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला क्षेत्रीय कार्यालयात झेंडे विक्रीचे केंद्र सुरू करण्यात आले.

नागरिक अनभिज्ञ असल्याने सर्व झेंड्यांची विक्री झाली नाही. खरेदी केलेले 50 हजार व मागील वर्षी शिल्लक 2 हजार 880 झेंडे असे एकूण 52 हजार 880 झेंडे उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यापैकी केवळ 23 हजार 278 झेंड्यांची 10 रुपये दराने विक्री झाली. तर, तब्बल 29 हजार 602 झेंडे शिल्लक राहिले आहेत. ते झेंडे आता गोदामात ठेवण्यात आले आहेत. पुढील वर्षी त्या झेंड्यांची विक्री केली जाईल, असे उत्तर महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून दिले जात आहे. दरम्यान, काही झेंडे आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला ठेकेदाराने उपलब्ध करून दिल्याचे त्याची विक्री झाली नसल्याचेही सांगितले जात आहे.

मागणीनुसार झेंड्यांची खरेदी
मेरी मिट्टी, मेरा देश या उपक्रमाअंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी 50 हजार सिल्कच्या झेंड्यांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, झेंडे खरेदी करून ते सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पुरविण्यात आले, असे महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

प्रशासकीय राजवटीत करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी
प्रशासकीय राजवटीत निविदा न काढता झेंड्यांची थेट पद्धतीने खरेदी करणे चुकीचे आहे. मोहीम राबविणार असल्याचे माहिती असताना असा प्रकार होत असल्याने खरेदीबाबत शंका निर्माण झाली आहे. असे असूनही सर्व झेंडे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात प्रशासन अपयशी ठरली आहे. तब्बल 30 हजार झेंडे पडून असल्याने करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचे समोर येत आहे, हा प्रकार निषेधार्ह असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले आहे.

यंदा अल्पप्रतिसाद
घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी 50 हजार झेंडे महापालिकेने खरेदी केले. ते क्षेत्रीय कार्यालयानिहाय विक्रीस ठेवण्यास आले होते. गेल्या वर्षी अनेकांनी गठ्ठ्याने झेंडे खरेदी केले. गेल्या वर्षीचे झेंडे असल्याने यंदा नागरिकांनी वैयक्तिकरित्या झेंडे खरेदी केले नाहीत. या उपक्रमासंदर्भात स्मार्ट सिटीच्या शहरातील व्हीएमडीवर प्रसिद्ध करण्यात आली. तसेच, जनसंपर्क विभागानेही जनजागृती केली, असा दावा मेरी मिटी, मेरा देश या मोहिमेचे समन्वयक उपायुक्त मिनीनाथ दंडवडे यांनी केला आहे.

निविदा न काढता थेट खरेदी
सिद्धी कॉपीअर्स अ‍ॅण्ड स्टुडंट कन्झुमर स्टोअर्स कडून 15 हजार झेंडे 24 रुपये दराने खरेदीस 3 लाख 60 हजार खर्च झाला आहे. तर, अर्थरिन टेक्नॉलॉजीस अ‍ॅण्ड एंटरप्रायजेसकडून 35 हजार झेंडे 24 रुपये दराने खरेदीस 8 लाख 40 हजार इतका खर्च झाला. हे झेंडे सिल्कमधील असून, त्यांची रुंदी 20 इंच आणि लांबी 30 इंच इतकी आहे. ही खरेदी निविदा न काढता थेट पद्धतीने करण्यात आली आहे. मेरी मिट्टी, मेरा देश ही मोहीम केंद्र शासनाने 1 ऑगस्टला जाहीर केली. त्यामुळे झेंडे खरेदी महापालिकेकडे पुरेशा कालावधी होता. मात्र, ऐनवेळी जागे झालेल्या प्रशासनाने पुरेशी जनजागृती न करता ऐनवेळी झेंडे उपलब्ध करून दिल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

पुणे : भारतमातेच्या जयघोषात जवानांना बांधल्या राख्या

नगर : कर्मचारी वेतनासाठी घेतले विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे

Back to top button