Geothermal Energy : जमिनीतील उष्णतेने घरांमध्ये हाेताेय वीजपुरवठा! | पुढारी

Geothermal Energy : जमिनीतील उष्णतेने घरांमध्ये हाेताेय वीजपुरवठा!

न्यूयॉर्क : जलविद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा, सौरऊर्जा अशा अनेक मार्गाने ऊर्जा मिळवली जात असते. त्यामध्येच भू-औष्णिक ऊर्जेचा समावेश होतो. पृथ्वीच्या पोटातील उष्णतेचा वापर करून वीज निर्माण करण्याची ही क्षमता. गरम पाण्याचे कुंड किंवा त्यामध्ये शिजवलेला भात, बटाटे अशी उदाहरणे आपण पाहत असतो; मात्र आता अशा उष्णतेचा वापर घरांमध्ये वीजपुरवठा करण्यासाठीही होईल. आतापर्यंत 30 देशांमधील सुमारे 400 ऊर्जा प्रकल्प पृथ्वीच्या पोटात निर्माण झालेल्या वाफेचा वापर करून वीजनिर्मिती करीत आहेत. त्यांची एकूण क्षमता 16 गिगावॅट आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या ग्लोबल स्टेटस रिपोर्ट 2023 मध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. भू-औष्णिक ऊर्जेसाठी 200 अंश सेल्सिअसपर्यंतचे पाणी 5 हजार मीटर खोल बोअरहोलमधून उपसले जाते. त्याची उष्णता वीजनिर्मितीसाठी वापरली जाते, असे संशोधकांनी सांगितले. 6 हजार अंश सेल्सिअस (11 हजार अंश फॅरेनहाईट) हे पृथ्वीच्या गाभ्याचे किंवा केंद्राचे तापमान आहे. सूर्य जितका उष्ण आहे तितकेच पृथ्वीचे केंद्रही उष्ण आहे. या तापमानातून मिळालेल्या उष्णतेवर आधारित ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या पूर्वजांनाही भू-औष्णिक ऊर्जेच्या सामर्थ्याची माहिती होती.

जर्मनीतील सहा संशोधन संस्थांनी केलेल्या विश्लेषणानुसार खोल भू-औष्णिक ऊर्जेसह उष्णता मिळविण्यासाठी किंमत तीन युरो सेंट प्रति किलोवॅट इतकी कमी आहे. आता जगातील पहिले व्यावसायिक भूऔष्णिक संयंत्र जर्मनीच्या बाव्हेरियामधील गेरेस्ट्राइड शहरात बांधले जात आहे. ते धरणातील पाण्यावर अवलंबून नाही. भारतातील भूऔष्णिक संसाधनांचे मॅपिंग भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षणाद्वारे केले जाते. विस्तृत संशोधनांनुसार, भारतामध्ये एकूण भू-औष्णिक ऊर्जा क्षमता 10 गिगावॉट असू शकते. सर्वात जास्त शक्यता लडाखमध्ये आहे. भारत यासाठी सक्रिय आहे.

Back to top button