खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस ‘राज्य क्रीडा दिन’ साजरा करणार | पुढारी

खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस ‘राज्य क्रीडा दिन’ साजरा करणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्‍या मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिवसानिमित राष्ट्रीय क्रीडा दिन पाळला जातो. त्याच धर्तीवर देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी म्हणजेच 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘राज्य क्रीडा दिन’ राज्यभर साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

पुढारी न्यूज – सॅटेलाईन चॅनल लोकसेवेत

महाराष्ट्र शासन आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दिले जाणार्‍या शिवछत्रपती पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह खासदार आणि आमदार उपस्थित होते.

यावेळी 2019-20, 2020-21 आणि 2021-22 अशा तीन वर्षांचे शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये दिलीप वेंगसरकर, श्रीकांत वाड आणि आदिल सुमारीवाला यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर 14 क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता पुरस्कार, 83 राज्य क्रीडा खेळाडू पुरस्कार, 14 दिव्यांग खेळाडू आणि 5 साहसी प्रकारातील खेळाडूंचा सन्मान झाला. एकूण 70 पुरुष आणि 49 महिला खेळाडूंचा असा 119 खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अनेक खेळाडू आपल्या मेहनतीच्या जोरावर भारताला पदके मिळवून देत असतात. अशा खेळाडूंच्या पाठीशी सरकार नेहमी राहील. त्याद़ृष्टीने शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराची रक्कम तीन ऐवजी पाच लाख, तर शिवछत्रपती राज्य क्रीडा गौरव पुरस्काराची रक्कम एकवरून तीन लाख रुपये करण्यात येईल. ही पुरस्काराची रक्कम 2019-20 पासून दिल्या जाणार्‍या पुरस्कारांसाठी लागू असेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

त्या-त्या वर्षी पुरस्कार द्यावेत

राज्यात कोणतेही राज्यकर्ते असले, तरी त्या-त्या वर्षी शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण करावे. सध्या अर्थमंत्री म्हणून माझ्याकडे कार्यभार असल्याने खेळाडूंच्या पारितोषिक रकमेमध्ये वाढ करावी. जेणेकरून खेळाडूंच्या कार्याचा उचित सन्मान होईल. त्याचबरोबर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.

हेही वाचा

अहमदनगर : टँकर मंजुरीत हलगर्जीपणा नको; पालकमंत्री विखे यांचा अधिकार्‍यांना इशारा

उत्तर प्रदेशातील जमिनीच्या वादातून गोव्यात खून, ४ जणांना अटक

चीनच्या गुप्त लष्कराचा भारताला धोका

Back to top button