उत्तर प्रदेशातील जमिनीच्या वादातून गोव्यात खून, ४ जणांना अटक | पुढारी

उत्तर प्रदेशातील जमिनीच्या वादातून गोव्यात खून, ४ जणांना अटक

पणजी : पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेश सारख्या दूरच्या राज्यामध्ये झालेल्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीचा गोव्यामध्ये जुने गोवा पोलीस ठाणे परिसरात खून करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुने गोवा पोलिसांना दि.२७ रोजी संध्याकाळी एका नदीच्या किनारी कुजलेल्या अवस्थेत चंद्रिका उर्फ गब्बर साहनी याचा मृतदेह आढळला होता. महत्त्वाचे म्हणजे हा मृतदेह पूर्णपणे नग्न होता. त्याला दोरीने बाधले होते. तसेच मृतदेह पाण्यावर येऊ नये यासाठी गळ्यामध्ये भला मोठा दगड बांधण्यात आला होता. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी तपास करून राजेंद्र प्रसाद (वय ३४) रणजीत प्रसाद (वय ३२), राजकुमार प्रसाद (वय ४६) या तिघा भावांसह अखिलेश कुमार साहनी अशा चार संशयितांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशात जमिन प्रकरणी वाद झाल्यानंतर गोव्यात व्यवसाय करणाऱ्या चंद्रिका उर्फ गब्बर साहनी याचा नियोजन पद्धतीने अमानुषपणे खून करण्यात आला आहे. जुने गोवा पोलिसांना मृतदेहाच्या गळ्यामध्ये दगड बांधलेल्या अवस्थेत व मृतदेह बांधलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर खुनाचा संशय व्यक्त केला होता. त्यासाठी खास पथक स्थापन करून तपास सुरू केला होता. जुने गोवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासाला यश आले आणि वरील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

गोव्यामध्ये यापूर्वी खुनाचे प्रकार घडलेले आहेत. मात्र अशाप्रकारे खून करून त्याला दोरीने घट्ट बांधून व गळ्यामध्ये दगड बांधून नदीत टाकण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलेला आहे. जुने गोवा पोलीस स्थानक पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button