चीनच्या गुप्त लष्कराचा भारताला धोका | पुढारी

चीनच्या गुप्त लष्कराचा भारताला धोका

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची (पीएलए) सर्वांना माहिती आहे. मात्र, चीन शॅडो आर्मी (गुप्त लष्कर) ही आणखी एक गुप्त लष्करी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या हालचाली वाढू लागल्या असून २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शॅडो आर्मीचा भारताला धोका आहे. एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकात यासंदर्भातील लेख प्रसारित झाला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या शॅडो आर्मीच्या कार्यपद्धतीबद्दल थोडक्यात माहिती..

थेट युद्धात सहभाग नाही

चीन या गुप्त लष्कराचा थेट युद्धात वापर करीत नाही. मात्र, शॅडो आर्मीचे लोक प्रत्येक देशात पाठवून चीन आपली मोहीम राबवत आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशांना या लष्कराचा मोठा धोका आहे.

यूएफडब्ल्यूडीद्वारे मोहीम

चिनी कम्युनिस्ट पार्टीने युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटच्या (यूएफडब्ल्यूडी) माध्यमातून या गुप्त लष्कराची बांधणी केली आहे. चीनच्या हिताला बाधा पोहोचविण्याचे काम करणार्‍या देशांविरोधात काम करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुप्त आर्मीची २०१७ साली स्थापना केली आहे.

लोकसभेत धोक्याची शक्यता

भारत आणि चीनमध्ये वास्तव नियंत्रण रेषेवरून तणाव आहे. ब्रिक्समध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये तणाव कमी करण्याबाबत चर्चा झाली असली तरी भारतात २०२४ साली होउ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चीनच्या गुप्त लष्कराकडून धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पत्रकार, तज्ज्ञांसह नेत्यांवर प्रभाव

या शॅडो लष्कराच्या वतीने विदेशातील पत्रकार, तज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढले जाते. अशा लोकांवर चीनच्या सकारात्मक बाजूंची मोहिनी घातली जाते. सार्वत्रिक निवडणुकांवर चिनी गुप्त लष्कराच्या वतीने प्रभाव टाकला जातो.

कॅनडा, ऑस्ट्रेलियाला प्रत्यय

कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील सार्वत्रिक निवडणुकींमध्ये चीनच्या गुप्त लष्कराने हस्तक्षेप केल्याचे प्रकारही उघडकीस
आले आहेत. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा आणि तैवानविरोधातील चिनी गुप्त लष्कराच्या कारवायांची प्रचिती तर नित्याचीच झाली आहे.

दूतावासातून दिल्या जातात टिप्स

यूएफडब्ल्यूडीद्वारे चीनमधील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठविले जाते. हे विद्यार्थी विदेशातील माहिती चिनी दूतावासांना पोहोचवितात.

थिंक टँक, एनजीओंना पैशाचे आमिष

भारताने चीनच्या हालचालींवर करडी नजर ठेवली आहे. तथापि, भारतातील चीनच्या दूतावासामधून शॅडो लष्कराच्या हालचाली गतिमान होत असल्याचे समजते. भारतातील काही थिंक टँक आणि काही एनजीओंना यूएफडब्ल्यूडीद्वारे पैशाचा पुरवठा करून चिनी अजेंडा राबविला जात असल्याची चर्चा आहे.

चिनी पत्रकारांच्या व्हिसांवर निर्बंध

गलवानमधील चीनच्या आगळिकीनंतर भारताने चिनी पत्रकारांच्या व्हिसावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे भारतातील चीनच्या छुप्या हालचालींना लगाम बसल्याचे ६७ टक्के लोकांनी म्हटले आहे, असे प्यू सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

Back to top button