चौफुला परिसरात बिबट्याची दहशत | पुढारी

चौफुला परिसरात बिबट्याची दहशत

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव, जुन्नरच्या डोंगरी भागातून काही वर्षांपूर्वी सुरू झालेली बिबट्याची वाटचाल हळूहळू भीमा नदी पार करून उसाच्या मळ्यात स्थिरावून आता दौंड तालुक्याच्या केडगाव चोफुलासारख्या पुणे-सोलापूर महामार्गाच्या जवळच्या नागरीवस्तीत सरसावू लागली आहे. चौफुला परिसरातील गडधे मळ्यात बिबट्या दिसल्याने मोठी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या फोनवरून ही माहिती सगळीकडे सांगितली गेली आहे.

गडधेमळा हा धायगुडे वाडी बोरीपार्धी गावचा भाग असला तरी पुणे-सोलापूर महामार्गाच्या अगदी जवळ असणारा परिसर आहे. या भागात शेतात काम करणार्‍यांना बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे मोठ्या प्रमाणात चर्चेत बोलले जात आहे. वन विभागाच्या कर्मचार्‍यांना याची माहिती देण्यात आली आहे. सध्या पावसाने पाठ फिरवली असल्याने खडकवासला कालव्याच्या पाण्याने शेतीतील पिके जगविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करू लागला आहेत, त्यासाठी रात्रीही शेतात जावे लागते. यातच बिबट्या दिसल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दौंड तालुक्यात बिबटे सुरुवातीला नदी परिसरात दिसत होते. आता ते पुणे-सोलापूर महामार्गाच्या परिसरात दिसू लागल्याने हा मोठा चिंतेचा विषय आगामी काळात होऊ शकतो.

गडधेवस्ती परिसरातील काही नागरिक चौफुला परिसरात हॉटेल, मेडिकल आणि किराणा दुकानांचा व्यवसाय करतात, काहींचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यावसायिकांना घरी जाण्यासाठी रात्री दहापेक्षा जास्त वेळ होतो, त्यांच्यात मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. या परिसरात जागृत राहिले पाहिजे, रात्री फटाके फोडून आवाज करा, अशा सूचना त्यांना अन्य नागरिक देऊ लागले आहेत. हळूहळू लोकवस्तीत बिबट्या स्थिर होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये राबविणार जलयुक्त शिवार २.०

जबाबदारी टाळणारी मुले, सुनांविरोधात गुन्हा; काय आहे नेमकं प्रकरण?

Back to top button