गणेश मंडळांच्या विधायक उपक्रमांना प्रशासनाचे सहकार्य : चंद्रकांत पाटील

गणेश मंडळांच्या विधायक उपक्रमांना प्रशासनाचे सहकार्य : चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवातील देखावे, प्रबोधनपर नाटके, जिवंत देखावे, हे पुण्यात झाल्यानंतर इतर शहरांत त्याचे अनुकरण झाले. आता काळानुरूप बदलणार्‍या गोष्टींचे भान आपण ठेवायला हवे. गणपती कसे आणायचे, कसे साजरे करावे, मिरवणूक काढणे, संपविणेविषयी मंडळांनी बसून निर्णय करण्याची परंपरा सुरू ठेवावी. कार्यकर्ते व गणेशोत्सव मंडळे परस्परसमन्वयातून जे विधायक ठरवतील, ते कसे चांगले होईल, यासाठी प्रशासनाचे सहकार्य राहील, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा-2022 पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडला, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अंकुश काकडे, परिमंडळ-1 चे उपायुक्त संदीपसिंह गिल, परिमंडळ-2 च्या उपायुक्त स्मार्तना पाटील, अ‍ॅड. प्रताप परदेशी, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

यंदाचा 'जय गणेशभूषण' पुरस्कार नाना पेठेतील साखळपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाला प्रदान करण्यात आला. स्पर्धेत कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्रमंडळाने द्वितीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टने चौथ्या, तर भवानी पेठेतील शिवाजी मित्रमंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेत सहभागी झालेल्या 152 मंडळांपैकी 104 मंडळांनी पारितोषिके मिळविली असून, एकूण 14 लाख 31 हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली. सलग 42 वर्षे ही स्पर्धा सुरू आहे. महेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विसर्जन मिरवणूक वेळेत होण्यासाठी प्रयत्न
गणेश मंडळांसह नागरिकांकडून येणार्‍या सूचनांचा मान ठेवून काम करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. तब्बल 36 ते 38 तास चालणारी विसर्जन मिरवणूक वेळेत व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले.

दगडूशेठ गणपती ट्रस्ट घेणार पुढाकार
हेमंत रासने म्हणाले, 'गणेश विसर्जन मिरवणुकीला रचनात्मक आणि विधायक वळण गरजेचे आहे. मिरवणूक 36 तास चालते. विसर्जन मिरवणूक गतिमान करता आली, तर जास्तीत जास्त मंडळांना लक्ष्मी रस्त्याने सहभागी होता येईल आणि मिरवणूक अनंत चतुर्दशीला संपेल.' याकरिता दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने पुढाकार घेतला असून, गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सर्वसमावेशक निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news