चीनमध्ये मिठासाठी मारामारी! जाणून घ्या कारण | पुढारी

चीनमध्ये मिठासाठी मारामारी! जाणून घ्या कारण

बर्लिन : चीनमध्ये सध्या मिठासाठी बरेच शीतयुद्ध सुरू झाले आहे. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटत आहेत. काही चिनी नागरिक तर अगदी पोत्याने मिठाचा साठा करून ठेवत आहेत. मिठाचे दर यादरम्यान तब्बल 300 टक्क्यांनी गगनाला भिडले आहेत. साहजिकच चिनी सरकारला यात हस्तक्षेप करावा लागला असून, ही परिस्थिती का उद्भवली, याचाही खुलासा करावा लागला आहे.

चिनी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जपानने गुरुवारी फुकुशिमा न्यूक्लियर प्रकल्प क्षेत्रात साठवून ठेवलेले 2 हजार कोटी लिटर पाणी प्रशांत महासागरात सोडणार असल्याची घोषणा केली. जपान या पाण्याचा वापर प्रकल्पाचे रिअ‍ॅक्टर्स थंड ठेवण्यासाठी करत असे. आता चीन व दक्षिण कोरियाला अशी भीती वाटत आहे की, यात रेडिओअ‍ॅक्टिव्ह घटक असू शकतात, ज्याद्वारे रेडिएशन पसरण्याचा धोका असेल.

आता चीन याच समुद्रातील पाण्यापासून मीठ तयार करत असल्याने साहजिकच मिठाला धोका वाढला आणि आणि या पार्श्वभूमीवर चिनी नागरिकांत आहे ते मीठ मिळेल त्या दराने खरेदी करण्यासाठी जणू युद्धच सुरू झाले आहे. चिनी नागरिक घाबरले आहेत आणि यातून सध्या उपलब्ध असलेले शक्य तितके मीठ खरेदी करून ठेवण्याकडे त्यांचा कल आहे, असे तेथील सरकारी कंपनीने कबूल केले आहे. अशा पाण्यात ट्रायटियमचे कण असू शकतात. त्यांना पाण्यापासून वेगळे केले जाऊ शकत नाही आणि कोणी या संपर्कात आले तर त्यांना कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर, चिनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिक मानले जाते.

Back to top button