ढोल पथकाच्या सरावासाठी तोडले मैदानाचे कुलूप | पुढारी

ढोल पथकाच्या सरावासाठी तोडले मैदानाचे कुलूप

हिरा सरवदे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशा पथकाच्या वादन सरावाला महापालिका प्रशासन परवानगी देत नसल्याने भाजयु मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गेटचे कुलूप तोडून आत जाण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती घेतल्यानंतर प्रशासनानेच या प्रकारानंतर तोंडी परवानगी देत प्रकरण दाबल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गणेशोत्सवजवळ आल्याने ढोल-ताशा पथकांचा वादन सराव शहराच्या विविध भागात सुरू आहे. यामध्ये मोकळ्या जागा, नदी पात्र यासह इतर ठिकाणांचा समावेश आहे. शासकीय जागांसह खासगी जागांमध्येही सराव सुरू आहेत. खासगी जागांसाठी जागा मालकांची परवानगी घेतली जाते. मात्र, शासकीय जागांवर सराव करण्यासाठी परवानगी घेतली जात नाही. शासकीय जागांवर थेट घुसखोरी करून सराव सुरू केला जातो. अधिकार्‍यांनी मज्जाव केल्यानंतर नेत्यांना फोन लावून दबाव टाकला जातो.

सणस मैदान खेळाडूंसाठी खुले करावे म्हणून खेळाडू, पालक, प्रशिक्षकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. असे असताना काही पथकांनी तर थेट सणस मैदान आणि नेहरु स्टेडियम जवळील मोकळी जागा, कबड्डी मैदान येथे शेड उभे करून सराव सुरू केले आहेत. दरम्यान, ढोल-पथकाच्या वादनासाठी प्रशासनाकडून परवानगी दिली जात नाही, गेटला कुलूप लावल्याने भाजयु मोर्चाच्या कार्यकर्ते घोषणाबाजी करत कुलूप तोडून प्रवेश करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यासंदर्भात क्रिडा अधिकार्‍यांना विचारणा  करण्याचा प्रयत्न केला असता, ते फोन घेत नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलुप तोडण्याचा प्रकार घडल्यानंतर अधिकार्‍यांनी सरावासाठी तोंडी परवानगी दिली आहे. तसेच कुलुप तोडल्याप्रकरणी कोणतीही कारवाई न करता प्रकरण दाबल्याचे सूत्रांनी सांगितले.

“सणस क्रीडांगण येथे ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू असल्यासंदर्भात क्रीडा विभागाकडून माहिती मागवून पुढील कारवाई केली जाईल.”

                                                          – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त

 

नेहरू स्टेडियमच्या परिसरातील मोकळ्या जागेत ढोल-पथक गेली आठ वर्षापासून सराव करत आहे. ढोल पथकाने शेड उभारून सराव सुरू केल्यानंतर गेटला कुलूप लावण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुलूप तोडले. ढोल-ताशा वादन हा खेळाचा प्रकार आहे. त्यामुळे मैदानाजवळीव मोकळ्या जागेत सराव करणे चुकीचे नाही.

                                       – बापू मानकर, शहराध्यक्ष, भाजयु मोर्चा

“गिरीश बापट पालकमंत्री असताना त्यांनी ढोलताशा पथक व नागरिकांच्या समन्वयातून कोणालाही त्रास होणार नाही व सराव देखील करता येईल अशी नियमावली तयार केली होती. पण तिचे पालन आता कोणीही करत नाही. असे असेल तर आम्हाला महापालिका भवनातील हिरवळीवर सरावासाठी परवानगी द्यावी अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.”

                                            – संजय बालगुडे, गणेशोत्सव कार्यकर्ता

हेही वाचा :

पुणे : ब्लॅकमेल करून 30 लाख उकळले

पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी दै. ’पुढारी’कडून क्रीडा स्पर्धांची मेजवानी

Back to top button