पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी दै. ’पुढारी’कडून क्रीडा स्पर्धांची मेजवानी | पुढारी

पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी दै. ’पुढारी’कडून क्रीडा स्पर्धांची मेजवानी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दै. ‘पुढारी’च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘राईझ अप’ पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या हंगामाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसर्‍या हंगामासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये तब्बल नऊ खेळांच्या क्रीडा स्पर्धा होणार असून, पुणेकरांना दै. ‘पुढारी’च्या वतीने क्रीडा स्पर्धांची मेजवानीच मिळणार आहे.

दै. ‘पुढारी’च्या वतीने पुण्यातील वाढत्या क्रीडा संस्कृतीमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील महिला खेळाडूंचा सहभाग वाढावा या उद्देशाने महिलांसाठीच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स, कॅरम, टेबल टेनिस, कुस्ती आणि जलतरण या खेळांचा समावेश आहे. पहिल्या हंगामामध्ये आठ खेळांचा समावेश करण्यात आला होता. या आठही खेळांमध्ये पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला.

या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दै. ‘पुढारी’च्या वतीने दुसर्‍या हंगामाची घोषणा करण्यात आली असून, या वर्षी कुस्ती या खेळाचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. या स्पर्धा शहरातील विविध ठिकाणच्या मैदानांवर रंगणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंकडून कोणतीही प्रवेश फी घेतली जाणार नाही. यामुळे महिला खेळाडूंचा दै. ‘पुढारी’च्या या सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग वाढलेला आहे. त्याचबरोबर यामधील काही क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम, मेडल, करंडक आणि प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार असून, सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे.

दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित ‘राईझ अप’ महिलांच्या क्रीडा स्पर्धांच्या दुसर्‍या हंगामाची सुरुवात बुद्धिबळ खेळाने होणार आहे. शनिवारी (दि. 2 सप्टेंबर ) सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ही स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये दहा वर्षांखालील, 11 ते 15 वर्षे, 16 ते 20 वर्षे, खुला गट अशा विविध गटांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत. रविवारी (दि. 3 सप्टेंबर) सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत गणेश कला क्रीडा मंच येथे खुल्या गटातील महिला कॅरमच्या स्पर्धा रंगणार आहेत.

ही कॅरम स्पर्धा पुणे जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने होणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थिनींसह अनेक महिला खेळाडूंनी मोठा प्रतिसाद नोंदविला आहे. या स्पर्धेला ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रूपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, तर सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

हेही वाचा :

शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याने संभ्रम दूर होईल?

18 वर्षे मंत्री होता, तुम्ही काय केले? : जितेंद्र आव्हाड

Back to top button