सावधान ! स्वस्तात मिळतंय म्हणून खरेदी कराल तर थेट तुरुंगात जाल…! | पुढारी

सावधान ! स्वस्तात मिळतंय म्हणून खरेदी कराल तर थेट तुरुंगात जाल...!

पिंपरी(पुणे) : स्वस्तात मिळतोय म्हणून कसलीही शहानिशा न करता माल खरेदी कराल, तर थेट तुरुंगाची हवा खाल; कारण मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. यातील विशेष बाब म्हणजे काही सराफांवरदेखील गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे कोणाकडूनही वस्तू खरेदी करताना शहानिशा करण्याची गरज निर्माण झाली आहे. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही वर्षांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे.

यामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासह पादचार्‍यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून नेणे, तसेच, रात्रीच्या वेळी घरफोड्या करून किमती ऐवज लंपास करण्याचे प्रकारही वरचेवर समोर येऊ लागले आहेत. यातील काही प्रकरणांमध्ये चोरट्यांनी काहीतरी भूलथापा मारून चोरीचा माल सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यात मारल्याचे समोर आले आहे. तर, काहीजणांनी स्वस्तात मिळतोय म्हणून चोरीचा माल खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, पोलिसांनी हेतू तपासून माल खरेदी करणार्‍यांना थेट गुन्ह्यात आरोपी करण्यास सुरुवात केली आहे.

सराफही सहभागी

सोन्याची पावती घरी राहिली आहे, वडिलोपार्जित सोने आहे, असे सांगून काहीजण सराफांना गंडवतात. मात्र, काहीजण स्वस्तात मिळत असल्याने कसलीही शहानिशा न करता सोने खरेदी करतात. पोलिस दुकानात आल्यानंतर त्यांची दिशाभूल करण्यासाठी सराफ वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतात. मात्र, पोलिसांनी आता उलटतपासणी करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार्‍या सराफांनी पोलिसी खाक्यासमोर आपण चोरीचा माल खरेदी केल्याची कबुली दिली आहे.

शहरात चोरलेल्या दुचाकी मराठवाड्यात

पिंपरी-चिंचवड शहरातून चोरलेल्या दुचाकींची मराठवाड्यातील सर्वसामान्य नागरिकांना विक्री होत असल्याचे समोर आले आहे. कागदपत्र नंतर बनवून देतो, असे सांगून चोरटे खेड्यातील नागरिकांना गंडा घालतात. केवळ पाच ते दहा हजारांत त्यांना दुचाकींची विक्री केली जाते. काहीजण दुचाकी चोरीची असल्याचे माहिती असूनही धाडस करतात. मात्र, अशा नागरिकांवर थेट गुन्हे दाखल केले जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उदा.
शहर परिसरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणार्‍या केआर टोळीच्या किरण गुरुनाथ राठोड (26, रा. दिघी), अर्जून कल्लप्पा सूर्यवंशी (19, रा. कोरेगाव भीमा), संतोष जयहिंद गुप्ता (18, रा खंडोबा माळ, भोसरी) यांना दरोडाविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी चोरलेल्या दागिन्यांची कोरेगाव भीमा आणि परभणी येथे विक्री केली. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित सराफ व्यावसायिकांनादेखील या गुन्ह्यात आरोपी केले आहे. तसेच, दागिन्यांची विक्री करण्यासाठी मदत करणार्‍या एका साथीदारालादेखील पोलिसांनी गुन्ह्यात घेतले आहे.

शहरात चोर्‍या करणार्‍या महम्मद मुस्ताक सिद्दिकी (24, रा. लातूर), पांडुरंग बालाजी कांबळे (23, रा. लातूर), तुषार ऊर्फ बाळ्या अशोक माने (24, रा. तळेगाव दाभाडे), अर्जून संभाजी कदम (25, रा. लातूर), पक्षाल मनोज सोलंकी (23, रा. चिंचवड), मुराद दस्तगीर मुलानी (36, रा. सातारा) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करीत पोलिसांनी 22 गुन्ह्यांची उकल केली.

या गुन्ह्यांचं तपासात चोरीचे दागिने विकणारे आणि विकत घेणारे दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. चोरलेल्या गाड्यांचे पार्ट खोलून त्याची भंगारात विक्री करणार्‍या चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चोरट्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर हा गोरखधंदा सुरू केला होता. आरोपीने ज्यांना पार्टची विक्री केली त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

प्रमाण वाढवण्याची गरज

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चोरीचा माल खरेदी करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही हे प्रमाण कमी आहे. बहुतांश प्रकरणात चोरी करणार्‍याला अटक केल्यानंतर माल खरेदी करणार्‍याकडून चिरीमिरी घेऊन त्याला सोडून दिले जाते. गुन्ह्यांच्या तपासात त्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. तसेच, काहीजण चोरीचा माल आरोपीच्या ताब्यातून जप्त दाखवतात. मात्र, चोरीचा माल खरेदी करणे बंद झाल्याशिवाय चोर्‍या आटोक्यात येणार नाहीत. त्यामुळे चोरीचा माल खरेदी करणार्‍यांवरदेखील कडक कारवाई झाली पाहिजे, असे तज्ञांचे मत आहे.

हेही वाचा

संगमनेर : गुंजाळवाडी रस्त्याचे काम पाडले बंद!

घोसपुरी-चिखली-कोरेगाव एमआयडीसीसाठी हालचाली

अहमदनगर बाजार समितीमध्ये भाजी बाजाराला होणार सुरुवात

Back to top button