मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून | पुढारी

मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मान्सूनच्या परतीचा प्रवास जवळ आला आहे. यंदा तो 17 सप्टेंबर रोजीच पूर्व राजस्थानातून निघेल. महाराष्ट्रातून 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. इंग्लंडमधील भारतीय वंशाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख दहा वर्षांपूर्वी एक सप्टेंबर ही होती. मात्र जसा मान्सून लहरी बनत चालला आहे, तशी त्याची परतीची तारीख वाढत 15 ते 17 सप्टेंबर अशी झाली. मागच्या वर्षी 2022 मध्ये तो 20 सप्टेंबर रोजी राजस्थानातून तर 20 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला निघाला होता.

यंदा मान्सून केरळमध्ये 8 जून रोजी आला तर तळकोकणात 11 जून रोजी दाखल झाला. मात्र महाराष्ट्र काबीज करण्यास त्याने तब्बल 22 दिवस विलंब केला. तो 25 जून रोजी राज्यात दाखल झाला. मात्र उत्तर भारत त्याने वेगाने काबीज करीत दहा ते बारा दिवस आधीच 2 जुलैपर्यंत गाठला. मान्सूनच्या परतीची तारीख भारतीय हवामान विभागाने दिली नसली तरीही विदेशात भारतीय मान्सूनवर अभ्यास करणार्‍या संंशोधकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या मते यंदा मान्सून भारतातून लवकरच परतीला निघेल.

कोण आहेत डॉ. देवरस
डॉ. अक्षय देवरस हे हवामानशास्त्रज्ञ, संशोधक असून ते संध्या नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स आणि हवामानशास्त्र विभाग, युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग, इंग्लंड येथे संशोधन शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. भारतीय उपखंडातील हवामानावर त्यांचे विशेष संशोधन आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे भारतातील पाऊसमान कसे कमी झाले आहे. यावरही त्यांनी संशोधन केले आहे. त्यांच्या मते अल निनोच्या प्रभावामुळे यंदा भारतात मान्सून क्षीण आहे. त्यामुळे उशिरा आगमन व लवकर प्रस्थान ठेवेल.

राज्याच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता
अरबी समुद्रात पश्चिमी वार्‍यांचा वेग वाढल्याने राज्यातील तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. 27 ते 29 ऑगस्टपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. पूर्वोत्तर भारतात हिमालयापासून मेघालयापर्यंत 27 पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, संपूर्ण देशातील पाऊस 28 नंतर कमी होणार आहे. शनिवारी (दि. 26) महाराष्ट्रात अचानक पश्चिमी वार्‍यांचा वेग वाढल्याने प्रामुख्याने कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मध्यम, तर तुरळक भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच, विदर्भ व मराठवाड्यात हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

ऑगस्टअखेर झालेला पाऊस
पूर्वोत्तर भारत : उणे 17 टक्के
पश्चिमोत्तर भारत : 8 टक्के अधिक
मध्य भारत : उणे 6 टक्के
दक्षिण भारत : उणे 16 टक्के
संपूर्ण भारत एकूण : उणे 7 टक्के

हेही वाचा :

शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याने संभ्रम दूर होईल?

मी भाजपात जाणार म्हणणारे मूर्खांच्या नंदनवनात : शरद पवार

Back to top button