शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याने संभ्रम दूर होईल? | पुढारी

शरद पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याने संभ्रम दूर होईल?

विकास कांबळे, कोल्हापूर

काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी काँग्रेसचे नेते पवार यांच्यासोबत गेल्यामुळे काँग्रेसची अवस्था काहीसी बिकट झाली होती. तशीच अवस्था राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडल्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची झाल्याचे दिसते. जिल्ह्यातील प्रमुख नेते, आमदार यांनी अजित पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पवार यांनी दिलेला वेळ यामुळे संभ्रमावस्थेत असणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढणारा असला तरी पवार कुटुंबातीलच व्यक्तींच्या उलटसुलट विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम, या दौर्‍याने दूर होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

शिवसेना फोडल्यानंतर भाजपने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळविला होता. विशेषत: ईडीच्या चौकशीचा फेरा मागे लावून राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून भाजपचे नेते करत होते; परंतु त्यांना यश आले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: राज्यातील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर बोट ठेवल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. त्यामुळे ते कधीही फुटू शकतात, असे वक्तव्य काँग्रेसच्या एका नेत्यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य दि. 2 जुलै रोजी खरे ठरले. यादिवशी अजित पवार राष्ट्रवादीतील 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले.

अजित पवार यांच्या फुटीचे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पडसाद उमटले. याला कोल्हापूर जिल्हा देखील अपवाद ठरला नाही. शरद पवार यांचे निष्ठावान म्हणून ओळखण्यात येणारे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे आ. राजेश पाटील यांना सोबत घेऊन अजित पवार गटात सामील झाले. हसन मुश्रीफ जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आ. के. पी. पाटील तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ या संस्थांचे संचालक राहिले. शहरातील बहुतांशी नगरसेवक मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिले. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे राहिले कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते. आपापल्यापरीने शरद पवार यांना समर्थन देत होते. नवीन पदाधिकारी निवडीमध्ये व्ही. बी. पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी देखील ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचे ठरविले.

निवडीनंतर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली. जिल्ह्यातील आढावा पवार यांना देण्यात आला. त्यानंतर पवार यांनी आपण दि. 25 ऑगस्टपासून कोल्हापूर दौर्‍यावर येत असून, सभेचे नियोजन करा, असे सांगितले. कार्यकर्त्यांना काय बोलायचे सुचेना. पावसाचे कारण सांगून महिनाभर सभा पुढे घेण्याचा प्रयत्न केला; पण पवारांनी त्यावर आता चर्चा नाही, तयारीला लागा, असे सांगितले.

सभांना गर्दी जमविणारे नेते तसेच सर्व प्रमुख कार्यकर्ते, जिल्हा बँक, गोकुळ, साखर कारखान्याचे संचालक सर्वच मुश्रीफ यांच्यासोबत अजित पवार गटात गेल्यामुळे या सभेकडे केवळ कोल्हापूर जिल्ह्याचे नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, शरद पवार यांच्या निष्ठावंतांनी पायाला भिंगरी बांधून जिल्ह्यातील पवार यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांना एकत्र केले. गावागावांत जाऊन बैठक घेतल्या. सभेच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. रोहित पवार हे सभेच्या अगोदर दोन- तीन दिवस जिल्ह्यात तळ ठोकून होते. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात दिसणारे; परंतु मध्ये न दिसणारे कार्यकर्तेही शरद पवार यांच्या दौर्‍यात दिसले.सभेला मिळालेल्या प्रतिसादाबरोबर शाहू महाराज यांनी भूषविलेल्या अध्यक्षपदाने देखील या सभेने लक्ष वेधून घेतले. शाहू महाराज सार्वजनिक कार्यक्रम असतात; परंतु कोणत्या पक्षाच्या राजकीय व्यासपीठावर ते जात नाहीत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेचे मात्र त्यांनी अध्यक्षपद भूषविले. त्यामुळे खासदारकीचे उमेदवार म्हणून त्यांची चर्चा होऊ लागली. यामुळे शाहू महाराज सभेला येतात की नाही, याविषय उलटसुलट चर्चा सुरू होत्या; परंतु त्यांनी तत्काळ त्याचा खुलासा करत या चर्चेला पूर्णविराम दिला. निवडणुकीच्या राजकारणात रस नसल्याचे शाहू महाराज यांनी आपणास सांगितल्याचा खुलासाही शरद पवार यांनी केला. परंतु, त्यांच्या उपस्थितीने राष्ट्रवादीला नक्कीच बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button