मी भाजपात जाणार म्हणणारे मूर्खांच्या नंदनवनात : शरद पवार | पुढारी

मी भाजपात जाणार म्हणणारे मूर्खांच्या नंदनवनात : शरद पवार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मी भाजपमध्ये जाणार, असे म्हणणारे मूर्खांच्या नंदनवनातच फिरत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपला लगावला. लोक जागा दाखवतील, त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल, यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नसाव्यात; अन्यथा दुसरे काय कारण असावे? असा खोचक सवालही त्यांनी केला. मुश्रीफांवर ‘ईडी’ची कारवाई सुरू होती. ती थांबली, त्यांनी कोणाशी संवाद साधला माहीत नाही, असेही पवार यांनी सांगितले.

सर्व जिल्ह्यांत जाऊन आम्ही आमचे म्हणणे मांडत आहोत. त्याला लोकांचे समर्थन मिळत आहे, त्याचवेळी भाजप आणि भाजपला पाठिंबा देणार्‍यांविषयी तरुण, ज्येष्ठ लोकांत नाराजी दिसत आहे. असे सांगत पवार म्हणाले, देशाच्या प्रश्नांवर संवाद महत्त्वाचा असतो. मात्र, पंतप्रधान कोणाशी संवाद करत नाहीत, विरोधक म्हणून आमच्याशी तर नाहीच नाही. महत्त्वाच्या प्रश्नावर कधी बैठक बोलवत नाहीत. मतभिन्नता असली तरी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे. मणिपूरच्या प्रश्नाकडे पंतप्रधानांनी कसे बघितले हे सर्वांना माहीत आहे. ईशान्येकडील या राज्यांना लागून चीनची सीमा आहे. यामुळे या राज्यातील शांतता अस्थिर होणे हे देशाच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने चिंताजनक आहे. लोकसभा निवडणुका होतील. मात्र, मोदी यांना बाकीच्या निवडणुकांशी काहीही देणेघेणे नाही, असेही त्यांनी सांगितले.

तुमचा विचार सोडा, आमच्यात या, पक्ष फोडा हेच सत्ताधारी पक्षाचे धोरण आहे. असा आरोप करत पवार म्हणाले, काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट नाही. आमदार म्हणजे पक्ष नव्हे. जे पक्ष सोडून गेले, त्यांच्यावर टीका करून त्यांचे महत्त्व वाढवणार नाही. जे या लोकांनी केले ते आपल्याला मान्य नाहीच. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत, आम्हीच पक्षाचे धोरण ठरवणार, भूमिका मांडणार. पक्षाविषयी अन्य कोणी बोलत असेल तर त्याला काय करावे, असे सांगत अजित पवार यांच्यावर पुन्हा प्रश्न विचारू नका, उत्तर देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला नवनेतृत्व गाव, तालुका पातळीवर तयार करायचे आहे. यामुळे तरुण वर्गाला संधी देण्याबाबत चर्चा होईल, तरुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट दिल्याप्रकरणी विचारता, राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप करत पवार म्हणाले, विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केले हे स्पष्ट असतानाही, सत्ताधार्‍यांना कोणता पुरावा सापडला नसावा. त्यांनी काय निर्णय घ्यावा हे त्यांच्यावरच अवलंबून आहे. राज्यात दुष्काळ, कांदा, दुधाचा भाव, साखरेचा भाव असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांबाबत, शेतकर्‍यांबाबत आपल्याला किती आस्था आहे, हे राज्यकर्त्यांनी कुठे दाखवलेले नाही. चिंता वाटावी, अशी ही परिस्थिती आहे. मुख्यमंत्री यांना शेतातील किती कळते, किती ज्ञान आहे हे आपल्याला माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्याच्या उद्योग धोरणाबाबत बोलताना उद्योग गुजरातकडे कसे नेता येईल, याकडेच पंतप्रधानांचे लक्ष असते. ते संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, ते गुजरातच्या सोयीचे निर्णय घेतात आणि हेच राज्याचेही धोरण आहे, अशीही टीका त्यांनी केली. संभाजी भिडे यांच्याविषयी विचारताच, काहीतरी चांगला विषय काढा, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने विरोधकांची स्थिती सुधारली, त्यांच्या दुसर्‍या यात्रेचा फायदाच होईल. असे सांगत पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्याबाबत काहीही चर्चा नाही. जर झाली तर पुढे निर्णय घेऊ. बीआरएसची भीती नाही, याउलट तेलगंणात यंदाच्या निवडणुकीत त्यांचे भवितव्य ठरणार आहे. हमीभावाबाबत शेतकरी संघटनांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबाच असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. सीमाप्रश्नी सुनावणीची तारीख लवकर मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. ‘चंद्रयान-3’ मोहिमेतील शास्त्रज्ञांनी देशाची प्रतिमा वाढवली, त्यांना सलाम आहे, असेही त्यांनी सांगितले.

कडू कोण आहेत?

आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेबाबत विचारता, कडू कोण आहेत? असा सवाल केला. कडू कोण असे बोलून आपण त्यांचे महत्त्व कमी करताय का? ते चार वेळा निवडून आले आहेत, असे सांगताच पवार यांनी ते चार वेळा आमदार असतील; पण मी चार वेळा मुख्यमंत्री होतो, असे सांगितले.

जे तुरुंगात गेले नाहीत, ते भाष्य करत आहेत

मुश्रीफांवर ईडीची कारवाई सुरू होती. ती नंतर थांबली. त्यांनी कोणाशी संवाद साधला मला माहीत नाही, आमच्यातील काही लोकांना तुरुंगात जावे लागले. पण जे तुरुंगात गेले नाहीत ते हे भाष्य करत आहेत, असेही पवार म्हणाले.

ज्याची क्षमता, ताकद त्याचा जागेसाठी आग्रह

निवडुन येण्याची ज्याची क्षमता आहे, त्यांनी त्या जागेसाठी आग्रह धरावा, अशी भूमिका आघाडीच्या बैठकीत मांडली जाईल, यानंतर जागेबाबत निर्णय होईल, असे सांगत कोल्हापूरच्या सभेत शाहू महाराज यांनी अध्यक्षपद स्वीकारले, हा आनंदाचा धक्का होता. लोकांची इच्छा असेल तर पाहू; पण सध्या शाहू महाराज यांची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी सांगितले.

दोन वेळा साधला पत्रकारांशी संवाद

पवार यांची सकाळी अकरा वाजता नियोजित पत्रकार परिषद होती. तत्पूर्वी सव्वा दहा वाजता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यानंतर पवार यांनी आपण 11 ची वेळ दिली होती, त्यानुसार मुद्रित माध्यमांशीही संवाद साधणार आहोत, असे सांगत पुन्हा पत्रकार परिषद घेतली.

Back to top button