18 वर्षे मंत्री होता, तुम्ही काय केले? : जितेंद्र आव्हाड | पुढारी

18 वर्षे मंत्री होता, तुम्ही काय केले? : जितेंद्र आव्हाड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांनी बोलावून मंत्रिपदे दिली, सर्व काही दिले तरीही मुश्रीफांचे रडगाणेच सुरू आहे. विकासासाठी आम्ही भाजपसोबत गेलो, हे मुश्रीफ यांचे म्हणणे किती हास्यास्पद आहे. ते 18 वर्षे मंत्री होते. मग या मंत्रिपदाच्या काळात तुम्ही काय केले? असा सवालही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. ज्या बापाने मोठे केले, त्या सदाशिव मंडलिक यांना तुम्ही काय केले? सर्व काही देऊनही वयाच्या 83 व्या वर्षी पवार यांना त्रास देणे शोभते का? असा सवालही त्यांनी मुश्रीफ यांना केला.

पवार यांच्या कोल्हापुरातील सभेची खिल्ली उडवणार्‍या मुश्रीफ यांना सभा झाल्यानंतर धडकी भरली आहे, असे सांगत आपण सभेत कोणाचे नाव घेतले नव्हते तरीही आपले भाषण मुश्रीफ यांना इतके का झोंबले? असा सवालही त्यांनी केला.

पवार कोल्हापुरात आले की त्यांच्या गाडीत कोण बसत होते, लोकांना कोण खाली उतरवत होते, हे सर्व माहिती आहे. पण, आता नवीन लोकांना संधी मिळेल, अगदी कागल तालुक्यातीलच काही जणांनी उत्स्फूर्तपणे भाषण केलेले पाहिलेच आहे. या सभेने कोल्हापुरातील वातावरणही पवारमय झाले आहे. नवीन वारे दिसत आहे.

स्वाक्षर्‍या केलेल्या 53 आमदारांत आव्हाड होते, हे मुश्रीफ यांच्या व्यक्तव्यावर आव्हाड यांनी, होय, मी त्या पत्रावर स्वाक्षरी केलीच होती. ते मी नाकारतच नाही. पण शिंदे गेल्यानंतर आपणही वेगळा विचार कारावा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यासाठी ते पत्र होते. पण ते पत्र शरद पवार यांच्यापर्यंत पोहचलेच नाही. ज्यांच्याकडे होते, त्यांनी नंतर ते फाडूनही टाकले. हे कदाचित मुश्रीफ यांना माहीत नसावे, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.

Back to top button