पिंपरी : पालिका, जलसंपदाच्या अधिकार्‍यांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : पालिका, जलसंपदाच्या अधिकार्‍यांवर गुन्हा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : फायरिंग करून खून केल्याच्या प्रकरणात सरकारी पंच म्हणून सेवा देण्यास टाळाटाळ करणार्‍या महापालिका, जलसंपदाच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगवी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि महापालिकेच्या करसंकल विभागाचे सहमंडल अधिकारी यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याची दोषसिद्धी वाढवण्यासाठी सरकारी कर्मचार्‍याची पंच म्हणून सेवा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र, शासकीय कर्मचारी/अधिकारी या आदेशाला केराची टोपली दाखवत पंच म्हणून सेवा देण्यास नकार देत आहेत.

दरम्यान, बुधवारी (दि. 23) रक्षक चौक, पिंपळे निलख येथे सागर सर्जेराव शिंदे (रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सांगवी पोलिसांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि महापालिकेच्या करसंकल विभागाचे सहमंडल अधिकारी यांना सरकारी पंच म्हणून सेवा देण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, नेहमीप्रमाणे अधिकार्‍यांनी पोलिसांच्या पत्राकडे कानाडोळा केला. त्यामुळे सांगवी पोलिसांनी शासन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांवर भारतीय दंड संहिता 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. सांगवी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

… म्हणून शासकीय पंच आवश्यक

एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलिस अधिकारी पंचनामा करतात. पंचनाम्याच्या वेळी उपस्थित असलेल्या पंचाचे जबाब खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण ठरतात. गुन्हा घडल्यापासून ते खटला सुनावणीस येण्यासाठी काही प्रकरणामध्ये बराच कालावधी उलटून जातो. अशा वेळी खासगी पंच सुनावणीदरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते. पंच फितूर झाल्यामुळे बहुतांश गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटल्याच्या यापूर्वीच्या नोंदी आहेत.

परिणामी दोष सिद्धीचे प्रमाण घटू लागले आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाकडून सात किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये पंच म्हणून सरकारी कर्मचार्‍यांची सेवा घेण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. या आदेशानुसार पोलिस तपासात सरकारी कर्मचार्‍यांना पंच म्हणून सेवा देणे बंधनकारक आहे.

हेही वाचा

वडगाव मावळ : गावपण टिकलंय पण रावपण हरवलंय !

पिंपरी : डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाने प्लेटलेट्सला मागणी

वडगाव मावळ : धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सुधारित अहवाल सादर करा

Back to top button