राजकारणी हे सर्वांत मोठे कलाकार : उदय सामंत | पुढारी

राजकारणी हे सर्वांत मोठे कलाकार : उदय सामंत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राजकीय क्षेत्र सर्वांत आव्हानात्मक आहे. येथे शिकण्यासारखे खूप असल्याने तरुणांनी राजकारणात अवश्य यावे. राजकारणात बरेचदा ध्यानीमनी नसणार्‍या गोष्टी कराव्या लागतात. राजकारण्यांसारखे कलाकार कोणत्याच क्षेत्रात नाहीत, अशी टिप्पणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. खालच्या थराला जाऊन टीका न करता परिपक्व राजकारण झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
परिवर्तन संस्थेतर्फे ‘संवादातून परिवर्तनाकडे’ या विषयावर राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद शुक्रवारी एस. एम. जोशी सभागृहात झाली. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी सामंत बोलत होते. या वेळी आमदार रवींद्र धंगेकर, ‘ग्यान की वाचनालय’चे प्रदीप लोखंडे, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अभिजित घुले, शेखर वाल्हेकर आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘आम्ही राज्यात 14 महिन्यांपूर्वी मोठे परिवर्तन घडविले. पुण्यातील परिवर्तनाचे पडसाद सर्वत्र उमटतात. अजितदादांनी केलेल्या परिवर्तनाचे पडसादही सर्वत्र उमटतील. राजकारणामध्ये कोणीच एकमेकांचे मित्र किंवा शत्रू नसतात. जनतेच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.’ सामंत यांनी रवींद्र धंगेकर यांच्या जनसंपर्काचे मोकळेपणाने कौतुक केले. ते म्हणाले, ‘धंगेकरांचा संघर्ष मला माहीत आहे आणि त्यांचा लोकांशी असलेला थेट संपर्कही कौतुकास्पद आहे. मात्र, काही लोकांचा जनतेशी असलेला संपर्क तुटला आहे. काही राजकारणी आपले मुख्यमंत्रिपद गेले, हे अद्याप स्वीकारायला तयार नाहीत,’ असा टोला सामंत यांनी उध्दव ठाकरे यांना उद्देशून लगावला.

हेही वाचा : 

पुणे : अकरा समाविष्ट गावांचा डीपी पुन्हा लांबणीवर

पुणे : फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणाच्या फेरतपासणीचा अर्ज फेटाळण्याची मागणी

Back to top button