पुणे : फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणाच्या फेरतपासणीचा अर्ज फेटाळण्याची मागणी | पुढारी

पुणे : फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणाच्या फेरतपासणीचा अर्ज फेटाळण्याची मागणी

महेंद्र कांबळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणाच्या फेरतपासणीच्या अर्जावर दोन महिन्यात निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात झाली. यामध्ये सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी करण्यात आलेला फेरतपासणीचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली.

10 जुलै 2014 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये सहा व्यक्ती जखमी झाल्या होत्या. या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) संशयित पाच आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्याचे सांगत तपास थांबवलेला होता. मात्र, याबाबत वकील तोसिफ शेख यांनी या बॉम्बस्फोटच्या घटनेचा निष्पक्ष फेरतपास करण्यात यावा, असा अर्ज येथील न्यायालयात दाखल केला. मात्र, त्यावर मागील पाच वर्षात कोणताही निर्णय न झाल्याने याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

एटीएसने या प्रकरणाची चौकशी करून मोहम्मद अजाजुद्दीन उर्फ अरविंद, आनंद उर्फ शेख मेहबूब शेख इस्माईल उर्फ गुड्डू ,किसन उर्फ झाकीर हुसेन बदल हुसेन, पप्पू उर्फ अमजद खान उर्फ दाऊद रमजान खान, संतोष उर्फ बिलाल उर्फ अस्लम मोहम्मद खान पाच आरोपींची नावे निष्पन्न केली होती. संबंधित संशयितांवर बॉम्बस्फोटाचे आरोपही ठेवण्यात आले. मात्र, सदर आरोपींना महाराष्ट्रातील कोणत्याही न्यायालयात एटीएसकडून हजर केले गेले नाही. दरम्यान मध्यप्रदेश ,ओरिसा आणि हैदराबाद याठिकाणी कारागृहातून पळून गेल्याचे सांगत पोलीस चकमकीत संबंधित आरोपी ठार झाल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.

त्यानंतर 23 जून 2017 रोजी एटीएसने याबाबतचा क्‍लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आणि त्याच दिवशी न्यायालयाने संबंधित केसची सुनावणी बंद केली होती. मात्र, याबाबत 30 नोव्हेंबर 2017 रोजी मी न्यायालयात याचिका दाखल करून संबंधित केसचा फेरतपास करण्यात यावा अशी मागणी ऍड. तौसिफ शेख यांनी केली होती. उच्च न्यायालयाने पुणे न्यायालयाला संबंधित याचिका दोन महिन्यात निकाली काढण्यास सांगितलेले होते. ऍड. तौसिफ शेख यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात त्यांनी गुन्ह्यात त्यांचा घर मालक असल्याचा संशय व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे म्हटले होते. तसेच तोच मास्टर माईंड आल्याचाही आरोप केला आहे.

या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने झाला नसल्याचा आरोप अर्जातून केला आहे. तपास यंत्रणेने सिडीआर काढले नाहीत, सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील छेडछाड झाली, जे आरोपी होते त्यांना कधीच इथल्या न्यायालयात हजर करण्यात आले नाही. त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकले नसल्याचे ऍड. शेख यांनी त्यांच्या लेखी अर्जात नमूद केले. मात्र याला सरकारी वकील विजय फरगडे यांनी विरोध केला.

ज्या कुलकर्णी नावाच्या घरमालकावर जे आरोप झाले तो घरमालक शासकीय सेवेतून निवृत्त झाला आहे. निवृत्ती नंतर त्यांना जो प्रॉव्हिडंट फंड मिळाला त्यातून त्यांनी जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीवर बंगला बांधला होता. तेथे 2013 पासून तीन तरुण राहत होते. परंतु कुलकर्णी हे भाडे घेण्यासाठी तेथे जात होते. त्यांच्याबद्दलही एटीएस ने पुरावा गोळा केला होता. त्यांचे कॉलेजचे पेपर सिडीआर देखील जप्त केला होते. बंगल्यातील काही लाईटबिल च्या झेरॉक्सच्या आधारे आरोपींनी सिमकार्ड खरेदी केली होती. बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी त्या कुलकर्णी यांच्या नावावर घेतलेल्या सिमकार्डचा वापर झाला होता.

हे सर्व कॉल डिटेल्स सर्व कुलकर्णीच्या नावाने आल्याने ऍड. शेख यांनी कुलकर्णी हाच घर मालक गुन्ह्याचा मास्टर माईंड असल्याचा आरोप केला. तसेच (सीआरपीसी173(8)) गुन्ह्याचा फेरतपास होण्याची मागणी शेख यांनी केली आहे. दरम्यान ऍड. फरगडे यांनी याप्रकरणी युक्तिवाद करताना ऍड. शेख यांना असा अर्ज करता येऊ शकत नाही. या प्रकरणात तपास अधिकारी सोडून दुसरे कुणाला फेरतपासासाठी अर्ज करता येत नाही. यामध्ये तक्रारदार आणि अन्य कुणालाही पुढील तपासासाठी दाद मागायची असेल तर ती ट्रायल कोर्टात मागता येत नाही हे नमूद केलं.

याप्रकरणात दहशतवाद्यानी बॉम्ब असलेली दुचाकी फरासखाना पोलिस ठाण्यासमोर लावली होती. त्यांचे विश्रामबाग पोलिस ठाण्यासमोरील फुटेज मिळाले होते. नंतर स्वारगेट येथील त्यांचे फुटेज मिळाले होते. त्याबरोबरच त्याच्या बरोबर सहप्रवासी होते त्यांचेही जबाब नोंदवले असल्याचे फरगडे यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान आरोपींना आसाम सह अन्य एका ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्या प्रकरणात अटक झाली होती. मात्र जेल तोडून पळून जात असताना त्यांचा चकमकीत मृत्यू झाला असल्याचाही युक्तिवाद यावेळी करण्यात आला. दरम्यान यांचे फोटो त्यांचा बरोबरच्या सहप्रवासी यांना दाखविले त्यानीही मारले गेलेले दहशतवादी तेच असल्याची ओळख पटवली होती. त्यामुळे याप्रकरणात फेर तपासाची गरज नसल्याचा युक्तिवाद करताना फरगडे यांनी ऍड. शेख यांचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली.

Back to top button