Sharad Pawar | राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचेच नेते; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ 

Sharad Pawar | राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचेच नेते; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ 

बारामती : राष्ट्रवादीत फूट नसून अजित पवार आमचेच नेते आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत बोलताना केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आहे. "ते (अजित पवार) आमचे नेते आहेत. आमच्यात वाद नाही. राष्ट्रवादीत फूट नाही. पक्षात फूट कधी पडते? जेव्हा राष्ट्रीय स्तरावर एखादा मोठा गट पक्षापासून वेगळा होतो तेव्हा असे घडते. मात्र राष्ट्रवादीत आज तशी परिस्थिती नाही. काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली पण याला फूट म्हणता येणार नाही. लोकशाहीत ते असे करू शकतात, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांच्या भूमिकेचे एकप्रकारे समर्थनच केले आहे.

अजित पवार यांनी भाजपासोबत वेगळी चूल मांडली तेव्हापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच नाही तर जनताही या पक्षातील नेत्यांच्या विधान आणि भूमिकांमुळे संभ्रमात आहे. त्यात अलीकडेच अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. आता या वक्तव्याला दुजोरा देणारे वक्तव्य शरद पवार यांनीही केले आहे.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली नाही. कुणाला कोणता वेगळा निर्णय घ्यावा लागला तर तो लोकशाही नुसार त्याचा अधिकार आहे."  शरद पवारांच्या या विधानाने एकूणच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार आज सातारा जिल्ह्यातील दहिवडीत सकाळी पवारांची जाहीर सभा आहे तर संध्याकाळी ४ वाजता कोल्हापुरात त्यांची सभा होणार आहे.

अजित पवार उद्या बारामतीमध्ये ! 

तब्बल ६५ दिवसांच्या कालखंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत शनिवारी (दि. २६) येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीने अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्येही सभा घेणार आहेत.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news