अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : घनकचर्याच्या निविदेत मनमानी करणार्या कंपनीच्या मॅनेजरने स्वराज्य संघटनेच्या उपोषणकर्त्यास शिवीगाळ करून खासदाराच्या नावाने दमबाजी केली आहे. अशापद्धतीने लोकांना त्रास देण्यासाठीचे हे कायदे खासदाराने तयार केले आहेत का, असा संतप्त सवाल करतानाच, पाथर्डीत तुमचे अधिकारी दारू पिऊन शिवीगाळ करतात, त्यांना पाठीशी घालू नका, अन्यथा मी एकदा बसलो तर मग उठणार नाही, असा इशारा आमदार नीलेश लंके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिला.
जिल्हा परिषदेत घनकचर्यातील निविदेच्या चौकशीसाठी स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी, तर पाथर्डीतील प्रशासकांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आम आदमीचे किसन आव्हाड यांनी उपोषण सुरू केले आहे. आज तिसरा दिवस असून, कोणीही या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे काल दुपारी आमदार लंके यांनी या दोन्ही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला.
या वेळी आमदार लंके यांनी सीईओ येरेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करताना, आपण स्वराज्य संघटनेच्या उपोषणाची दखल घेणे अपेक्षित होते; मात्र तुम्ही याकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त करतानाच निविदेत हस्तक्षेप करणार्या कंपनीची वरिष्ठांकडे तक्रार करावी, तसे आंदोलनकर्त्यांचे पत्र पुढे पाठवावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. तसेच पाथर्डीत तुमचे अधिकारी रात्री दीड वाजता उपोषणकर्त्यांना दारू पिऊन शिव्या देतात, तुम्हाला त्याचे रेकॉर्डिंग पाठवितो, तुम्ही यावर कारवाई करणे अभिप्रेत आहे. मात्र तरीही तुम्हाला तुमच्या अधिकार्यांना पाठीशी घालायचे असेल, तर मग तो शेवटी तुमचा निर्णय असेल, असेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले.
प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे. मी चार दिवस उपोषणाला बसलो, तरी दखल घेतली नाही. तुमची तर कोणीच दखल घेणार नाही. तुम्ही येथे मेले तरी सीईओ खाली येणार नाहीत, उलट सिव्हिलला फोन करून मृतदेह घेऊन जा, असे ते सांगतील, अशी संतप्त भावना आमदार नीलेश लंके यांनी बोलून दाखविली.
हेही वाचा