पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यामध्ये विजेवर चालणार्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील 4.56 दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै 2023 मध्ये 14.44 दशलक्ष युनिट झाली आहे. वीज विक्रीत दहा महिन्यांत तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणार्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची सूचना शासनाने केली आहे. महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणार्या वाहनांसाठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे महावितरणकडून केली जातात.
राज्यात महावितरणची आणि खासगी अशी एकूण 3 हजार 214 चार्जिंग स्टेशन आहेत. त्याच्या माध्यमातून वाहनांसाठी झालेली विजेची विक्री लक्षात घेतली तर वेगाने वाढ झालेली दिसते. वाहनांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये राज्यात 4.56 दशलक्ष युनिट वीजविक्री झाली होती. मार्च 2023 मध्ये ही विक्री 6.10 दशलक्ष युनिट झाली, तर जुलै 2023 मध्ये 14.44 दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली.
राज्यातील विद्युत वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. 2018 साली राज्यात 4 हजार 643 विद्युत वाहनांची विक्री झाली होती, तर 2022 साली 1 लाख 89 हजार 698 विद्युत वाहनांची विक्री झाली होती. राज्यात 31 मार्च 2023 अखेर एकूण विद्युत वाहनांची संख्या 2 लाख 98 लाख 838 झाली आहे. या सुमारे तीन लाख विद्युत वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाख आहे. विजेवर चालणार्या बसेसची संख्या राज्यात झपाट्याने वाढली आहे. राज्यात 2018 साली केवळ चार विद्युत बसेसची नोंदणी झाली होती. 2022 साली ही संख्या 336 झाली. मार्च 2023 अखेर राज्यात एकूण 1 हजार 399 विद्युत बसेस आहेत.
किफायतशीर प्रवास
विद्युत वाहनांमुळे पर्यावरण रक्षणाला मदत करण्यासोबतच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते. पेट्रोलवर चालणार्या पारंपरिक दुचाकी वाहनाला इंधनाचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे 2 रुपये 12 पैसे येतो, तर विद्युत दुचाकीला प्रति किलोमीटर 54 पैसे खर्च येतो. पेट्रोलियमवर चालणार्या चारचाकी वाहनाला प्रति किलोमीटर सुमारे 7 रुपये 57 पैसे खर्च येतो, तर विद्युत चारचाकीला प्रति किलोमीटर 1 रुपया 51 पैसे खर्च येतो. तीनचाकी गाडीचा प्रति किलोमीटरचा खर्चही पेट्रोलियमसाठी सुमारे 3 रुपये 2 पैसे, तर विजेसाठी 59 पैसे आहे.
हेही वाचा :