बहुतांश रॉकेट सफेद रंगाचे का असतात? | पुढारी

बहुतांश रॉकेट सफेद रंगाचे का असतात?

नवी दिल्ली : 1960 च्या दशकात अंतराळवीरांना चंद्रावर घेऊन जाणार्‍या ‘सॅटर्न व्ही’ पासून सध्याच्या काळातील ‘फाल्कन-9’ किंवा ‘एरियन-5’ हीच नव्हे तर अन्यही बहुतांश रॉकेटस् सफेद रंगाची असतात. हा केवळ योगायोग नाही. त्यामागेही वैज्ञानिक कारण आहे.

रॉकेट प्रामुख्याने सफेद असण्याचे मुख्य कारण हे असते की, अंतराळयान उष्ण होऊ नयेत. तसेच आतील क्रायोजेनिक प्रॉपेलंट्सना म्हणजेच इंधनास लाँचपॅडवर आणि लाँचिंगच्या वेळी सूर्याच्या रेडिएशनच्या संपर्कात येऊन परिणामस्वरूप उष्ण होण्यापासून वाचवणे हे आहे. बहुतांश अंतराळयानांमध्ये अशा प्रोपेलंट्सचा वापर केला जातो जे अत्याधिक थंड असतात.

बहुतांश रॉकेट पहिल्या टप्प्यात वापरण्यात येणार्‍या ‘आयपी-1’ इंधनाशिवाय जवळजवळ सर्व अन्य लिक्विड प्रोपेलंट्स क्रायोजेनिक पदार्थ असतात. त्यांना द्रवरूपात टिकवून ठेवण्यासाठी शून्यापेक्षा कमी तापमानावर संग्रहित करणे गरजेचे असते. उदा. रॉकेटच्या वरील भागांमध्ये वापरण्यात येणार्‍या लिक्विड हायड्रोजनला उणे 253 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात थंड ठेवणे गरजेचे असते. लिक्विड ऑक्सिजन, बहुतांश लिक्विड इंधन प्रकारांसह वापरण्यात येणार्‍या ऑक्सिडायजरला उणे 183 अंश सेल्सिअसपर्यंत थंड करणे गरजेचे असते.

एकदा या प्रोपेलंट्सना लाँच वाहनात पंप केले की त्यावेळी कूलिंगचा अन्य कोणताही मार्ग नसतो. त्यामुळे ते गरम होऊ लागतात. त्यामागील कारण म्हणजे बहुतांश लाँच सुविधा भूमध्य रेषेच्या जवळील क्षेत्रात आहेत. तेथील उष्ण वातावरण या हिटिंग प्रोसेसला गती देतात. सर्व प्रकारच्या रंगांमध्ये सफेद रंग सूर्याची उष्णता परावर्तित करण्यास अधिक सक्षम आहे. सूर्यकिरणे सफेद रंगांवरून परावर्तित होत असतात. त्यामुळे रॉकेटस्नाही हाच रंग दिला जातो. त्यामुळे वाहनातील अंतर्गत टँकमधील क्रायोजेनिक प्रोपेलंट्स गरम होण्याचा वेग धिमा होतो.

Back to top button