सोन्याच्या बांगड्या चोरणारे अटकेत ; पीएमपीएल बसप्रवासात मारत होते डल्ला | पुढारी

सोन्याच्या बांगड्या चोरणारे अटकेत ; पीएमपीएल बसप्रवासात मारत होते डल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कटिंग करून चोरणार्‍या रेकॉर्डवरील आरोपींना अटक केले आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरीविरोधी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली. संतोष उर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव ( वय 41 ,रा. हडपसर, मूळ रा. काळंगिरी, तालुका -गुलबर्गा, कर्नाटक) आणि सुधीर ऊर्फ तुंड्या नागनाथ जाधव (वय – 45, रा. -अंबरनाथ ,ठाणे ) अशी आरोपींची नावे आहेत.

बसमध्ये हातातील बांगडी चोरून नेल्याचा एक गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक करीत होते. पोलीस गस्त घालत असताना पोलीस नाईक रवींद्र लोखंडे व अजिनाथ येडे यांना माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सोन्याचा बांगड्या कटिंग करून चोरणारा गुन्हेगार संतोष जाधव व त्याच्या साथीदार यांनी मिळून केलेला आहे. सदर दोघेही वाडिया कॉलेजकडून कोरेगाव पार्ककडे जाणार्‍या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाजवळ उभे आहेत.

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन संतोष जाधव व सुधीर जाधव या आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी संबंधित गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 20 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली व कटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस हवलदार बाळू गायकवाड , प्रदीप राठोड, पोलीस नाईक रवींद्र लोखंडे ,अजिनाथ येडे ,गणेश ढगे, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, पोलीस अंमलदार शिवाजी सातपुते, सुमित ताकपेरे, महेश पाटील, श्रीकांत दगडे यांनी कारवाई केली.

हेही वाचा :

छत्रपती शिवरायांच्या मूळ कागदपत्रांचा ठेवा होणार खुला

पुणे : शोरूम फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

Back to top button