पुणे : शोरूम फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड | पुढारी

पुणे : शोरूम फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  चारचाकी गाड्यांचे शोरूम फोडणार्‍या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. चोरट्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यात 21 गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सावन दवल मोहिते (वय 19), सोनू नागुलाल मोहिते (वय 22), अभिषेक देवराम मोहिते (वय 20), जितू मंगलसिंग बेलदार (वय 23, चौघे, रा. बोधवड, जि. जळगाव), बादल हिरालाल जाधव (वय 19, रा. मुक्ताईनगर, जळगाव), पिंटू देवराम चौहान (वय 19, रा. इंदूर मध्य प्रदेश) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत.

बिबवेवाडी भागात मध्यरात्री 28 जुलै रोजी देवकी मोटर्स शोरूम फोडून चोरट्यांनी 4 लाख 96 हजारांची रोकड चोरली होती. कात्रज भागातील दोन मोटार विक्री शोरूमधून रोकड चोरीचे दोन गुन्हे घडले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी वेगवेगळ्या भागांतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चोरटे ज्या वाहनातून पसार झाले होते. ते वाहन जळगावमधील असल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांचे पथक जळगावला रवाना झाले.

आरोपी उत्तर भारतात फिरायला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथकाने दिल्ली, मथुरा, हरिव्दार येथे पोहोचले. चोरटे रेल्वेने मुंबईला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या मुंबईतील वांद्रे भागात सापळा लावून सहा जणांना पकडले. अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लाहोटे, चेतन चव्हाण, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, राहुल ढमढेरे, विलास खंदारे, दाऊद सय्यद, अमित कांबळे, रमेश साबळे, दया शेगर, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, अश्रुबा मोराळे, अकबर शेख आदींनी ही कामगिरी केली.

गोव्यात मौजमजा
चोरट्यांनी 21 जुलै रोजी पुण्यातील मोटार विक्री दालनात चोरी केली होती. मोटारीतून चोरटे मुंबई-बंगळुरू महामार्गाने गोव्याला निघाले. वाटेत कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात मोटार विक्री दालन फोडून चोरी केली. चोरीच्या पैशांवर चोरट्यांनी गोव्यात मौजमजा केली. गोव्यातून परतताना वेरना पोलिस ठाण्याच्या परिसरातील दोन मोटार विक्री दालने मध्यरात्री फोडून रोकड चोरल्याचे तपासात उघडकीस आले.

हेही वाचा :

Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प

Pune Metro : मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच

Back to top button