

राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राजगुरुनगर शहरातील जुना मोटर स्टॅन्ड परिसरामध्ये मंगळवारी (दि २२)सकाळी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. वडापाव, फळविक्रेते, मच्छी बाजार व किरकोळ व्यावसायिकांची अचानक झालेल्या या कारवाईने चांगलीच धावपळ उडाली. अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाल्याने वाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शहरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
राजगुरुनगर नगरपरिषद , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्यधिकारी श्रीकांत लाळगे यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचार्यांसह पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ३ अधिकारी,३० पोलिस आणि १० गृहरक्षक दलाचे जवान कारवाई दरम्यान उपस्थित होते.
कारवाई झालेल्या जुना मोटार स्टॅण्ड परीसरात टपऱ्या , हातगाड्या रस्त्याच्या आजूबाजूला थाटण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. नागरिकांच्या तक्रारी नंतर अश्या टपऱ्या, हातगाड्या व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत असे पत्र देण्यात आले होते.प्रतिसाद न मिळाल्याने आजची कारवाई करण्यात आली.
नगरपरिषद आणि पोलिस आल्यावर यातील बहुतेक हातगाडी व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविली. तर ताडपत्री,प्लास्टिक कागदाचे छत करुन तयार केलेली दुकाने जेसीबी, ट्रॅक्टर,कर्मचाऱ्यांच्या माध्यमातुन जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईला काही व्यावसायिकांनी किरकोळ विरोध केला. मात्र अतिक्रमण स्वतःहून काढायला वेळ दिल्याने हा विरोध मावळला. कारवाई नंतर रिकाम्या झालेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सतर्क राहावे अशी अपेक्षा यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
हेही वाचा