पुणे जिल्ह्यातील वीजबिल थकल्याने 860 अंगणवाड्या अडचणीत | पुढारी

पुणे जिल्ह्यातील वीजबिल थकल्याने 860 अंगणवाड्या अडचणीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याचे कारण सांगत मागील दोन वर्षांपासून वीजबिल थकविण्यात आले आहे. वीजबिल न भरल्याने जिल्ह्यातील 860 अंगणवाड्या विजेविना आहेत. वीजच नसल्याने अंगणवाड्यांमध्ये अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जवळपास एक कोटी 33 लाख रुपयांचे वीजबिल थकविले असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात 4 हजार 384 अंगणवाड्या कार्यान्वित झाल्या आहेत. या एकूण अंगणवाड्यांपैकी 3,566 एवढ्या अंगणवाड्या स्वतंत्र इमारतीत आहेत. त्यामध्ये तीन हजार 173 अंगणवाड्या या वीजजोड घेतलेल्या आहेत.

मात्र, स्वतंत्र इमारती असूनही 435 अंगणवाड्यांना स्वतंत्र वीजजोड अद्याप मिळाले नाहीत. अनेक अंगणवाड्यांना वीज जोडण्यासाठी खांब उपलब्ध नाहीत. खांबापासून अंगणवाडीचे अंतर खूप आहे. तसेच मीटर बसविले नाही अशी कारणे वीज वितरण कंपनीकडून अंगणवाड्यांना देण्यात आली आहेत. त्यामुळे त्या अंगणवाड्या अद्याप अंधारात आहेत. दरम्यान, वीजच नसल्याने ज्या अंगणवाड्यांमध्ये संगणकाद्वारे बालकांना शिक्षण दिले जाते, ते पूर्णपणे ठप्प असून अन्न शिजवण्यासाठी काही ठिकाणी विद्युत शेगड्या वापरल्या जातात. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना इतर पर्यायांचा अवलंब करावा लागत आहे. तसेच फॅनसह पुरेशा प्रकाशासाठी आवश्यक असणारे बल्बही बंद आहेत.

अनेक अंगणवाड्या या ग्रामपंचायतीच्या इमारतीत कार्यान्वित आहेत, त्यामुळे त्या अंगणवाड्यांचे वीजबिल हे ग्रामपंचायतींनी भरणे अपेक्षित आहेत. मात्र, ग्रामपंचायतींनी आमची आर्थिक क्षमता नसल्याचे कारण सांगून वीजबिल भरण्यास हात वर केले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून दोन वर्षांपासून वीजबिल थकले आहे. आतापर्यंत एक कोटी 33 लाख 35 हजार 788 एवढी रक्कम वीजबिलापोटी थकीत असल्याचा फटका अंगणवाड्यांना बसत आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामंपचायतींनी अद्याप अंगणवाड्यांच्या वीजबिलांचे पैसे भरले नाहीत. त्यामुळे बिल थकल्याने काही गावातील अंगणवाड्यांचे वीजजोड तोडण्यात आले आहेत, तर जिल्हा परिषदेने दिलेल्या निधीतून अद्यापही काही अंगणवाड्यांना वीजजोड मिळू शकलेले नाहीत, त्यामुळे 860 अंगणवाड्यांना सध्या वीजपुरवठा नाही.

– जामसिंग गिरासे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बाल कल्याण

हेही वाचा

पुणे : पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

अल्पवयीन मुलावर तरुणीचा धमकावून लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलिसांसाठी लोकसहभागातून 60 कोटी मिळवून देणार : पालकमंत्री

Back to top button