पुणे : पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती | पुढारी

पुणे : पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केशवनगरला पाणीपुरवठा करणार्‍या लष्कर येथील पाणीपुरवठा केंद्राच्या मगरपट्ट्याजवळ असलेली पाइप लाइन फुटल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली, तर या संधीचा फायदा टँकरचालकांनी घेऊन एका पाण्याच्या टँकरचा दर दुप्पट केला.

केशवनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून एक दिवसाआड पाणी येते, तेही केवळ ‘अर्धा तास’ कोणत्या भागात किती वेळ पाणी सोडायचे हे पाणी सोडणारा ठरवतो. त्याला काही रक्कम दिली की पाणी कितीही वेळ पैसे देणार्‍यांच्या भागात सुरू असते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास सुरू आहे. याबरोबरच कमी दाबाने पाणी सोडले की, ‘टँकर’ लॉबीची चलती सुरू होते. केशवनगरमध्ये टँकरची संख्या एवढी मोठी आहे की, रस्त्यावर इतर वाहनांपेक्षा टँकरच जास्त दिसतात. असे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी या भागास नसल्यामुळे नागरिकांचे प्रश्न कोणी सोडवायचे हा प्रश्न कायमच अनुत्तरीत राहिलेला आहे.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून केशवनगर भागात पाणीपुरवठा होत नाही. लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून या भागास पाणीपुरवठा होत आहे. मात्र, मगरपट्ट्याजवळ असलेल्या प्रोग्रेसिव्ह सोसायटी येथे पाइप लाइन फुटल्याने या पूर्ण भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी पाइप लाइन दुरुस्त करण्यात मग्न आहेत. मात्र, त्यास विलंब झाल्याने नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले आहेत. शेजारीच असलेल्या मुंढवा भागास दररोज किमान पाच ते सहा तास पाणी आणि केशवनगरला मात्र दिवसाआड पाणी तेही अर्धा तास, केशवनगरचा पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा आता मोठे आंदोलन करावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

आता मात्र मोठ्या प्रमाणावर आंदोलन करावे लागेल. लष्कर पाणीपुरवठा केंद्राकडून केशवनगर भागास पाणीपुरवठा करण्यात कायमच दुजाभाव होत आहे. मुंढव्याप्रमाणेच केशवनगरला दररोज पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे अन्यथा लष्कर पाणीपुरवठा केंद्राला टाळे ठोकू.

– सोमनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते.

लष्कर पाणीपुरवठा केंद्राच्या मगरपट्ट्याजवळील प्रोग्रेसिव्ह सोसायटी येथे पाइप लाइन फुटली. ती दुरुस्त करण्यास दोन दिवसांचा विलंब झाला. त्यामुळे केशवनगरमधील नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

– अनिरुद्ध पावसकर,
मुख्य पाणीपुरवठा अधिकारी, पुणे महापालिका

हेही वाचा

अहमदनगरमधील 500 गावांवर पावसाची खप्पामर्जी; आजपासून पिकांची पाहणी

अल्पवयीन मुलावर तरुणीचा धमकावून लैंगिक अत्याचार

कांदाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली आज बैठक

Back to top button