घरांच्या किमतीची कोटी-कोटी उड्डाणे ; विक्रीत पुणे शहर देशात दुसरे | पुढारी

घरांच्या किमतीची कोटी-कोटी उड्डाणे ; विक्रीत पुणे शहर देशात दुसरे

दिगंबर दराडे

पुणे : पुण्यात सुरू झालेली मेट्रो सेवा, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय विमानतळाची वाटचाल, बँकांची महागलेली कर्जे आणि वाढत्या महागाईमुळे पुण्यातील घरांच्या किमती कोटीची उड्डाणे करू लागल्या आहेत. मागील दहा वर्षांत तब्बल आठ ते दहापटींनी किमती वाढल्या असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, बावधन, खराडी, विमाननगर, अमनोरा या ठिकाणी उभ्या राहत असलेल्या इमल्यांमुळे पुणे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. शहर आणि परिसरात पसरत असलेले मेट्रोचे जाळे, रिंगरोडची वाटचाल, आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा यामुळे पुणे शहरात घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

मागील तीन ते चार वर्षांपूर्वी सत्तर ते ऐंशी लाख रुपयांना मिळणारा फ्लॅट आता कोटीच्या घरात पोहोचला आहे. शहराच्या भोवती वाढत असलेल्या आयटी क्षेत्रासह, औद्योगिकीकरणामुळे देशभरातून पुण्यात नोकरीनिमित्त राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत. येणारा प्रत्येक जण पुण्यात घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गृहनिर्माण क्षेत्रात बांधकामाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. बांधकामाच्या एकूण खर्चात कच्चा माल-67 टक्के , मजुरी-28 टक्के आणि इंधनाचा खर्च-5 टक्के यांचा समावेश असतो, अशी माहिती रिअल इस्टेटच्या एका अहवालातून समोर आली आहे.

सिमेंट, लोखंड, स्टील, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमसह प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आहेत. वर्षभरात सिमेंटच्या किमतीत 22 टक्के, तर स्टील 30 टक्क्यांनी, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमच्या दरात उच्चांकी अशी वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वच बाबींवर होत असल्याचे दिसून येत आहे. जागेच्या किमतीदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, त्यामुळे घरांच्या किमती वाढल्या असल्याचे वास्तव आहे.
                                                – सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई

मागील काही दिवसांमध्ये स्टील, सिमेंट आणि अन्य कच्या मालाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. या किमती वाढल्यामुळे आपोआपच बांधकामाच्या खर्चात वाढ झाली. याचा परिणाम प्रामुख्याने घरांच्या किमती वाढण्यावर झाला आहे.
                                                         – जयंत शहा, बांधकाम व्यावसायिक

बांधकामाला लागणारा सर्वच कच्चा माल महाग झालाय. वर्षभरात बांधकामाच्या खर्चात जवळपास 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीचा परिणाम घरांच्या किमतीवर निश्चितपणे होतो. मागील वर्षापासून बांधकाम साहित्याचे दर जरा स्थिर आहेत. मात्र त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे पाहायला मिळालेले आहे.
                                        – रणजित नाईनवरे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो 

 

हेही वाचा :

आयातीसाठी परवानाराज कशाला?

लडाखमध्ये शहीद जवानांना लष्करी सन्मानासह श्रद्धांजली वाहिली

Back to top button