

पुणे : पुढारी वृत्तसेवा : टोमॅटोच्या नवीन लागवडीचे सुरू झालेले उत्पादन आणि परराज्यांतून टोमॅटोच्या मागणीत मोठ्या प्रमाणात झालेली घट, यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डात टोमॅटोचे भाव चांगलेच खाली आले आहेत. घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला 25 ते 40 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात एका किलोचे भाव 50 रुपयांपर्यंत आल्याने सर्वसामान्य ग्राहक पुन्हा टोमॅटोच्या खरेदीकडे वळू लागल्याचे चित्र आहे. टोमॅटोला सातत्याने मिळणार्या कमी दराने मागील वर्षी शेतकर्यांनी पिके काढून टाकली. त्यात मॉन्सूनने ओढ दिल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात मागील दोन ते तीन महिन्यांत टोमॅटोची आवक चांगली रोडावली होती. या काळात बाजारात दररोज 20 ते 25 किलोच्या अवघ्या पाच ते सहा हजार क्रेटची आवक होत होती.
बाजारात दाखल होत असलेल्या टोमॅटोच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर 180 रुपयांपर्यंत पोहचले होते. टोमॅटोचे दर आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह उपाहारगृहचालकांनी टोमॅटोच्या खरेदीकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, सध्या टोमॅटोच्या नवीन लागवडीचे उत्पादन सुरू झाल्याने बाजारात दररोज 8 ते 9 हजार क्रेटमधून टोमॅटो बाजारात दाखल होत आहे. त्यात परराज्यातून मागणी घटल्याने घाऊक बाजारात टोमॅटोचे दहा किलोचे भाव 250 ते 400 रुपयांपर्यंत आले आहेत. तर, किरकोळ बाजारात एका किलोचे भाव 50 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तब्बल दोन महिन्यांनंतर टोमॅटोचे भाव 50 रुपयांवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असून, त्यांच्याकडून पुन्हा टोमॅटोची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे.
हेही वाचा :