Mission admission : राखीव जागांवरील प्रवेशासाठी उद्या शेवटचा दिवस | पुढारी

Mission admission : राखीव जागांवरील प्रवेशासाठी उद्या शेवटचा दिवस

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सध्या प्रतीक्षा यादीतील चौथ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी सोमवारी (दि.21) शेवटचा दिवस आहे. प्रवेशासाठी अद्यापही 18 हजार 968 जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेद्वारे नियमित प्रवेश जाहीर झालेले विद्यार्थी आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अशा एकूण 82 हजार 879 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 847 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण 3 लाख 64 हजार 413 अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून 94 हजार 700 विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश जाहीर करण्यात आले. नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी चार फेर्‍या राबवण्यात आल्या. त्यात पहिल्या फेरीत 13 हजार 655, दुसर्‍या फेरीत 3 हजार 579, तिसर्‍या फेरीत 1 हजार 259 आणि
चौथ्या फेरीत 475 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेशासाठी सोमवारी शेवटचा दिवस आहे. परंतु सध्या उपलब्ध जागांपैकी 82 हजार 879 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर प्रवेशासाठी अद्यापही 18 हजार 968 जागा रिक्त राहिल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा:

बुडालेली द्वारका पुन्हा जिवंत होतेय !

धक्कादायक ! प्रवरा नदीपात्रात रक्तमिश्रीत पाणी

Back to top button