धक्कादायक ! प्रवरा नदीपात्रात रक्तमिश्रीत पाणी | पुढारी

धक्कादायक ! प्रवरा नदीपात्रात रक्तमिश्रीत पाणी

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवाशातील प्रवरा नदीच्या पात्रात रक्तमिश्रीत व दूषित पाणी सोडणार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने नेवासा नगरपंचायत कार्यालयासमोर शनिवारी (दि.19) उपोषण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे उपोषण सुरू होते. दरम्यान, या मागणीच्या अनुषंगाने नेवासा नगरपंचायतीचे कर्मचारी ताराचंद चव्हाण व परशुराम डौले यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील प्रभाग 13 व 16 मध्ये जाऊन पाहणी केली.

या भागात बेकायदा कत्तलखाने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून शहरातील 11 जणांविरुद्ध अनधिकृतपणे कत्तलखाने चालवून भुयारी गटारीद्वारे प्रवरा नदीच्या पात्रात रक्तमिश्रीत पाणी सोडल्याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.19) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे तपास करीत आहेत.

नेवासा शहरातील प्रवरा नदीच्या पात्रात काही दिवसांपासून दूषित पाणी सोडले जात आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे नगरपंचायतीकडे करण्यात आली होती. याशिवाय शनिवारी उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार शनिवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून उपोषण करण्यात आले. या उपोषणात सकल हिंदू बांधवांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नेवासा नगरपंचायतीचे कर्मचारी ताराचंद चव्हाण यांच्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी मुश्ताक उस्मान शेख, वाहिद बुढाण चौधरी, अकील जाफर चौधरी, रियाद कादर चौधरी, तोफिक आयाज चौधरी, जलाल अब्बास चौधरी, सलिम भैय्या चौधरी, अबु शामू चौधरी, अन्सार सत्तार चौधरी, वसीम गणी चौधरी, नदिम सत्तार चौधरी (सर्व रा. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

जागतिक डास दिवस : डासांविरोधातील कीटकनाशकांची परिणामकारकता घटतेय

बहार विशेष : कायदे बदलांचे दूरगामी परिणाम

Dutee Chand : कॅन्सरवरील औषधांमधून ‘एसएआरएम’ पोटात गेले

Back to top button