पिंपरी : पालिका शिक्षण विभागाची ‘डीबीटी’ योजना ‘फेल’ | पुढारी

पिंपरी : पालिका शिक्षण विभागाची ‘डीबीटी’ योजना ‘फेल’

वर्षा कांबळे

पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागाने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) चा निर्णय घेतला. मात्र ऑगस्ट महिना उजाडला तरी 19 हजारांहून अधिक विद्यार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे डीबीटी योजना फेल झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागात प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी मोठा गाजावाजा करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) करण्याचा निर्णय घेतला. परंतु, अद्याप निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांच्या खात्यावर अनुदान प्राप्त झालेले नाही.

दरवर्षी शालेय साहित्य खरेदीसाठी ठेकेदारामार्फत कोट्यवधी रुपये खर्च केले जात होते. मात्र, गतवर्षापासून महापालिकेने थेट लाभ हस्तांतरनुसार लाभार्थींच्या बँक खात्यात रोख देण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून सुरू झाली आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे 40 हजार 808, माध्यमिक 9 हजार 260 तर बालवाडीचे 6 हजार 564 इतकी विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. थेट लाभ हस्तांतरांमुळे दप्तर, शूज-मोजे, वह्या, व्यावसायिक पुस्तके, कंपासपेटी, रेनकोट, शालेय बूट, वॉटर बॉटल, फुटपट्टी, चित्रकला वही, भूगोलवही, प्रयोगवही आदी वस्तू रूपात साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत.

अनुदानाच्या पहिल्या आणि दुसरा टप्प्यात 21 हजार 262 विद्यार्थ्यांना लाभ दिल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. पहिल्या टप्प्यात 4 हजार 100 तर दुसर्‍या टप्प्यात 17 हजार 162 विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. तर तिसर्‍या टप्प्यातील 6 हजार 820 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे ‘डीबीटी’ योजनेतून प्राथमिकच्या 21 हजार 262 विद्यार्थ्यांना लाभ दिला.

पण, अद्याप प्राथमिकचे 19 हजार 546 विद्यार्थी, माध्यमिक 9 हजार 260 वंचित असल्याचे दिसून येत आहे. तसेच लाभ मिळालेल्या 21 हजार 262 विद्यार्थ्यांपैकी महापालिकेच्या 85 शाळांतील 4 हजार विद्यार्थ्यांची बँक खात्याची माहिती चुकीची असल्याची आढळून आली आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. तर प्रशासनाच्या अनास्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप बँक खाते उघडण्यात आलेले नाही.

डीबीटी योजनेतून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येत आहेत. काही विद्यार्थ्यांचे नव्याने प्रवेश झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे आधारकार्ड व्हेरिफाय करून पालकांकडून कागदपत्रे मागवून बँक खाते उघडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना लवकरच ‘डीबीटी’ लाभ दिला जाईल. एकही विद्यार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही.

-संजय नाईकडे
प्रशासन अधिकारी, शिक्षण

हेही वाचा

नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात

शेतकर्‍यांना आगाऊ पीक विमा भरपाई द्या : आ. काळे

विधानसभेच्या 51, तर लोकसभेच्या 11 जागा हव्या : जोगेंद्र कवाडे

Back to top button