शेतकर्‍यांना आगाऊ पीक विमा भरपाई द्या : आ. काळे

शेतकर्‍यांना आगाऊ पीक विमा भरपाई द्या : आ. काळे

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव मतदार संघातील सर्वच मंडलात 25 दिवसापर्यंत पावसाचा खंड पडला आहे. त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला. यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे कोपरगाव मतदार संघातील शेतकर्‍यांना आगाऊ पिक विमा भरपाई द्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. निवेदनात आ. काळे म्हणाले, तालुक्यातील सुरेगाव मंडलात 25 दिवस, कोपरगाव मंडलात 23 दिवस, रवंदा मंडलात 23 दिवस, पोहेगाव मंडलात 21 दिवस, दहेगाव मंडलात 13 दिवस व मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा मंडलात देखील पावसाचा खंड पडला आहे.

याचा मोठा फटका खरीप हंगामातील बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग, कांदा आदी पिकांना बसणार आहे. हंगामातील उत्पादन हे जवळपास 50 टक्क्यांपेक्षा जास्त घटणार आहे. शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. खरीप हंगाम 2023-24 मध्ये तालुक्यातील 33488 शेतकर्‍यांनी 38120.47 हेक्टर क्षेत्रावर व पुणतांबा मंडलात देखील 11574 शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेरणी केलेली आहे. लहरी हवामानाचा फटका पिकांना बसून नुकसान होवू नये यासाठी कोपरगाव मतदार संघातील एकूण 45,062 शेतकर्‍यांनी बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग, कांदा आदी पिकांचे 64,023 पिक विमा अर्ज भरलेले आहे.

शासन निर्णय व पिक विम्याच्या तरतुदी नुसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, पावसातील खंड व दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या अपेक्षित उत्पनात घट होणार असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्के पर्यंत नुकसान भरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार मतदार संघातील शेतकर्‍यांना होणार्‍या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तातडीने आगाऊ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आ. काळे यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

महसूल पथक तयार करावे

शेतकर्‍यांना पिक विम्याची नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी झालेल्या नुकसानीचे सर्व्हे करून तात्काळ पंचनामे करावे. यासाठी तालुक्यातील कृषी-महसूल विभागाचे पथक तयार करण्यासाठी सबंधित विभागाला तातडीने सूचना कराव्यात अशी मागणीआ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे पत्राद्वारे यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news